◼️ प्रभाग ५ व ६ मधील आयोजित स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
◼️ दरवर्षी स्पर्धा अधिक व्यापक स्वरूपात घेणार – सौरभ मलुष्टे
◼️ बक्षीस वितरण कार्यक्रमाला महिलांची मोठी उपस्थिती
रत्नागिरी : खास दिवाळीनिमित्त शहरातील प्रभाग क्रमांक ५ आणि ६ मधील महिलांसाठी शिवसेना शहर संघटक सौरभ मलुष्टे यांनी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या रांगोळी स्पर्धेला प्रभागातील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सौरभ मलुष्टे यांचे सामाजिक कार्य आणि प्रभागात असलेला संपर्क यामुळे ही स्पर्धा उत्साहात पार पडली. दिवाळीत आगळीवेगळी संकल्पना राबवून सौरभ मलुष्टे यांनी ती प्रत्यक्षात अंमलात आणली. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रविवार १ डिसेंबर रोजी पार पडला. यावेळी पारितोषिक विजेत्या बारा महिलांचा सन्मान करण्यात आला.
शिवसेना शहर संघटक आणि उद्योजक सौरभ मलुष्टे यांच्या मार्फत प्रभाग क्रमांक ५ व ६ मधील नागरिकांसाठी समाज उपयोगी कार्य नेहमीच सुरू असते.
प्रभागातील नागरिकांच्या अडीअडचणीत सौरभ मलुष्टे नेहमीच अग्रेसर असतात. येथील नागरिकांच्या सेवेसाठी आ. उदय सामंत आणि आ.किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सौरभ मलुष्टे आठवड्याचे सातही दिवस आणि चोवीस तास उपलब्ध असतात. सामाजिक कार्यासह प्रभागातील नागरिकांच्या कलाना वाव देण्यासाठी ते नेहमीच धडपडत असतात. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सौरभ मलुष्टे यांनी दिवाळीनिमित्त खास रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे घरीच रांगोळी काढून या स्पर्धेत सहभागी होता येणार असल्याने महिलांनी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेला प्रतिसाद मिळाल्या नंतर रांगोळी स्पर्धेचे परीक्षण जागतिक कीर्तीचे रांगोळीकार राहुल कळंबटे यांच्यासह तज्ञ परीक्षक मंडळाने घरोघरी जाऊन केले. पूर्णपारदर्शक पणे या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या निकालामध्ये ऋतुजा संदेश नांदगावकर यांनी पहिला क्रमांक पटकावला,त्यांना पैठणी साडी देऊन गौरवण्यात आले, जान्हवी वैशंपायन यांना दुसरा, श्रद्धा पाटोळे यांनी तिसरा क्रमांक पटकावला. चौथा क्रमांक पूनम हट्टीकर आणि श्रद्धा रेमणे यांना विभागून देण्यात आला. तर पाचवा क्रमांक स्नेहल जाधव यांनी पटकावला. उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी पाच जणांची निवड करण्यात आली. यामध्ये मुग्धा देसाई, वैशाली दळी, उर्मिला देशमुख, प्रियंका कांबळे, श्रेया अलकुंटे यांची निवड करण्यात आली. तर लक्षवेधी रांगोळी म्हणून रेवा पेडणेकर आणि विशेष कौतुक म्हणून कांचन सावंत यांची निवड करण्यात आली होती.
रविवार १ डिसेंबर रोजी या रांगोळी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. या बक्षीस वितरण समारंभाला रांगोळीकार राहुल कळंबटे,प्रमुख आयोजक सौरभ मलुष्टे यांच्यासह लायन्स क्लबच्या सदस्य श्रद्धा कुलकर्णी, दैनिक पुढारीच्या आवृत्तीप्रमुख जान्हवी पाटील, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष शिल्पा सुर्वे, शहर संघटक पूजा पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील बेंडखळे यांनी केले.तर बक्षीस वितरण कार्यक्रमावेळी सिद्धेश बंदरकर यांच्या नियोजनाखली महिलांसाठी खास खेळांचे देखील आयोजन करण्यात आले होते. घरच्या घरी रांगोळी काढून प्रथमच स्पर्धेत सहभागी होण्याची दिल्याबद्दल सहभागी महिलांनी आयोजक सौरभ मलुष्टे आणि मित्रमंडळाचे आभार मानले. तसेच अशी स्पर्धा दरवर्षी व्यापक स्वरूपात आयोजित करण्याची मागणी केली. ही मागणी आयोजक सौरभ मलुष्टे मित्रमंडळाच्या वतीने तत्काळ मान्य देखील करण्यात आली. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सिद्धी विचारे, तृप्ती विरकर, दीपिका पावसकर, मुक्ता बामणे, कीर्ती सावंत, तेजल पाटील, सीमा कदम, सई मलुष्टे, योगेश वीरकर यांनी विशेष मेहनत घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 02-12-2024














