Ladki Bahin Yojana: खोटी माहिती देणार्‍या ‘लाडक्या बहिणी’ लाभापासून राहणार वंचित

रत्नागिरी : Ladki Bahin Yojana : विधानसभेपूर्वी राबविलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अडीच कोटी महिलांनी अर्ज केले. त्यातील दोन कोटींहून अधिक महिलांना नोव्हेंबरपर्यंत लाभ देखील मिळाला. आता नुतन सरकार लाडक्या बहिणींना दरमहा २ हजार १०० रुपये देणार आहे. तत्पूर्वी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक निकषांची आता पडताळणी होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्यानंतर निकषांनुसार पात्र ठरणार्‍या लाडक्या बहिणींना राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यावर दि.१ एप्रिलपासून दरमहा दीड हजाराऐवजी एकविसशे रुपये दिले जाणार आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली. जुलै ते सप्टेंबरपर्यंत राज्यातील अडीच कोटींपर्यंत लाडक्या बहिणींचे अर्ज प्राप्त झाले. योजनेच्या लाभासाठी कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे, वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांचे असावे, लाभार्थीच्या कुटुंबातील कोणी आयकर भरणारा नसावा, एका शासकीय योजनेचा तेवढ्याच रकमेचा लाभ घेणार्या महिला अपात्र असतील, असे निकष घालण्यात आले होते. मात्र, या निकषांची काटेकोर पडताळणी होवू शकली नाही. त्यामुळे प्रत्येक अर्जदाराकडून स्वयंघोषणापत्र घेतले आणि त्या सर्वच २१ ते ६५ वयोगटातील अर्जदार लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ दिला. त्यासाठी एका वर्षासाठी ४५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली.

अनेकांनी पात्र नसतानाही अर्ज केल्याची चर्चा आहे. त्यामुळे योजनेच्या निकषांची काटेकोर पडताळणी झाल्यास मोठ्या प्रमाणावर लाभार्थी कमी होवू शकतात आणि तेवढ्याच निधीतून पात्र लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देणे शक्य होईल, असे राज्यस्तरावरील अधिकार्यांचे मत आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यावर योजनेच्या अधिक रकमेसाठी किती रक्कम तिजोरीतून अगाऊ जावू शकते, निकषांची पडताळणी झाल्यास किती लाभार्थी कमी होतील, यावर अभ्यास होईल, असेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

निकषांची पडताळणी झाली नाही; स्वयंघोषणापत्र घेतले
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्कम वाढेल, पण त्यासाठी शासन निर्णय अपेक्षित आहे. सध्याच्या लाभार्थींमधील आयकर भरणारे कोण आहेत, कुटुंबाकडे चारचाकी आहे का, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिकांनी अर्ज केले आहेत का, याची पडताळणी झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे. पण, प्रत्येकाकडून स्वयंघोषणापत्र घेतले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:14 02-12-2024