मंडणगड : आंबडवे-राजेवाडी राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत

मंडणगड : केंद्र शासनाने संसद ग्राम योजनेमधून हाती घेतलेल्या आंबडवे राजेवाडी राष्ट्रीय महामार्गाचे काम यंदाचे बांधकाम हंगामात तरी पूर्ण होणार का? असा प्रश्न तालुकावासीयांना पडला आहे. याबरोबर प्रगतीपथावर सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम स्थानिकांच्या सूचनांसह लवकर पूर्ण व्हावे, या प्रतीक्षेत आता तालुकावासीय आहेत.

२०१६ साली सुरु झालेल्या आंबडवे लोणंद या राष्ट्रीय महामार्गावरील महाड येथील राजेवाडी ते आंबडवे या सुमारे साठ किमी अंतरात मार्गाचे नूतनीकरण रुंदीकरणाबरोबर कॉक्रिटी करणाने होत आहे. मात्र, या कामाला विलंब होत असल्याने हा मार्ग सध्या बर्चेत आहे. या मार्गाच्या नूतनीकरणामुळे आजूबाजूच्या परिसरात सुबत्ता निर्माण होईल, यात शंका नाही.

पर्यटनाबरोबर, दळणवळणासाठी हा मार्ग महत्वपूर्ण ठरेल. मात्र, भविष्यकालीन वाढती रहदारी आणि लोकवस्ती, वाढते शहरीकरण लक्षात घेऊन महामार्ग प्राधिकरणाने मार्गाचे काम सुस्थितीत व गुणवत्तापूर्ण करणे गरजेचे आहे व त्यासाठी तालुकावासीय आग्रही आहेत. गत सहा वर्षात हा प्रकल्प केंद्र शासनाच्या अखत्यारित असतानाही रखडला, देशभरात रस्त्याची करोडो रुपयांची विकासकामे सुरू असताना मंडणगडच्या पदरी मात्र नेहमीप्रमाणे निराशा राहिली. काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी आवश्यक असताना आठ वर्षे झाली तरी रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. सुरुवातीच्या काळात साधारण दीड ते दोन वर्षांनी कामाचे ठेकेदार बदलण्यात आले. विद्यमान ठेकेदाराची दोन वर्षांपूर्वी नियुक्ती झाल्यापासून रस्त्याचे काम सुरु केले, तरी ते सध्या धिम्यागतीने सुरू आहे.

दरम्यान, रस्त्याच्या नूतनीकरणात स्थानिकांची मागणी, भौगोलिक रचना यांचा विचार करण्यात यावा, अशा मागणीला जोर घरला असला तरी स्थानिकांच्या मागण्या व सूचनांकडे संबंधितांनी नेहमीच दुर्लक्ष केले आहे. मार्गाची निर्मिती होत असताना अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक सुरक्षेची काळजी मेण्यात आली आहे का, याबाबत सध्या नागरिकांमधून शंका आहेत.

रस्त्यामधील अनेक धोकादायक वळणे, चढ-उतार अनेक ठिकाणी तशीच ठेवण्यात आलेली आहेत. भविष्यकालीन विचार करून मार्गात असलेले दोष काढून सरळ, सुस्थितीत नव्याने मार्ग निर्मितीची ख्याती असलेले महामार्ग प्राधिकरण, हा मार्ग त्या गुणवत्तेत तयार करत आहे का, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. भविष्यात अनेक समस्या निर्माण होऊन स्थानिकांना त्यांना सामोरे जावे लागणार नाही याची दक्षता आताच घेणे आवश्यक आहे. रस्त्याच्या बाजूने उभी करण्यात आलेली गटारे ही भविष्यकाळात कळीचा मुद्दा ठरतील की काय, अशीही शंका निर्माण होते. कारण यातील सांडपाण्याचा निचरा कोठे होणार आहे, याचे उत्तर मिळालेले नाही. कुठल्याही गटाचे एक्हिाट पॉईंटवर ओढा अथवा नदी नाही. काम सुरु असलेल्या लगतच्या अनेक गावातील परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कामाची गती वाढवणे गरजेचे आहे, हे प्राधिकरणाने लक्षात घेतले पाहिजे.

अनेक गोष्टींमध्ये अस्पष्टता
या महामार्गाच्या विस्तारात शहरातील रस्त्यानजीकच्या बहुतांश दुकानांवर गदा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यांचे सिमांकन होऊनही शहरातील कामास कधी सुरुवात होणार या विषयी अद्याप स्पष्हता नसल्याने व्यापाऱ्यांसह शहरवासीय चिंतेत आहेत. मार्गाच्या कामात रस्त्याची रुंदी किती यावरून बाजारपेठेसह वस्त्यांमध्ये अनेक तर्क लावले जात असून चिंता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार यांच्याकडून येथील भौगोलिक परिस्थितीचे अवलोकन करून गुणवत्तापूर्ण कामे व्हावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:11 PM 02/Dec/2024