राजापूरातील रेल्वे आरक्षण केंद्र बंद

राजापूर : गेल्या आठवड्याहून अधिक काळ राजापूर शहरातील पोस्ट ऑफिसमधील रेल्वे आरक्षण सुविधा केंद्र विद्युत व्यवस्थेतील तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याने तालुकावासीयांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली असून, संताप व्यक्त केला जात आहे.

अथक प्रयत्नानंतर वर्षभरापूर्वी येथील पोस्ट कार्यालयात रेल्वे आरक्षण सुविधा केंद्र सुरू करण्यात आले होते. काही वर्षांपूर्वीच रत्नागिरी जिल्ह्यातील काही तालुक्यातील पोस्ट कार्यालयात रेल्वे आरक्षण सुविधा केंद्रे सुरू करण्यात आली होती. मात्र, सातत्याने मागणी होऊन देखील राजापूर शहरातील पोस्ट कार्यालयात रेल्वेचे आरक्षण सुविधा सेवा केंद्र सुरू झाले नव्हते. त्या बाबतची सातत्याने मागणी सुरू होती. रेल्वेच्या आजी आजी मंत्र्यांसह, कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्याकडे अनेक देशभरातील कुठल्याही गाडीचे आरक्षण करण्याची सुविधा या केंद्रातून उपलब्ध निवेदनाद्वारे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मात्र, संबंधित कोकण रेल्वे प्रशासन विभाग त्याकडे लक्ष देत नव्हता. अखेर त्या प्रयत्नांना यश आले आणि वर्षभरापूर्वी राजापूर शहरातील पोस्ट कार्यालयात रेल्वे आरक्षण सुविधा केंद्र सुरू करण्यात आले.

गेल्या वर्षभरामध्ये तालुक्यातील असंख्य रेल्वे प्रवाशांनी या आरक्षण सुविधा केंद्राचा चांगला लाभ घेतला असून त्याला प्रतिसादही चांगला मिळत होता मात्र, गेल्या आठवडाभराहून अधिक काळ हे आरक्षण केंद्र तांत्रिक कारणास्तव बंद असून त्या बाबत अधिक माहिती घेतली असता तेथे उपलब्ध असलेल्या मशीनरीला विद्युत पुरवठा होत नसल्यामुळे रेल्वे प्रवाशांना तिकीट उपलब्ध करून देणे अशक्य बनले आहे. गेल्या आठवडाभरात हे आरक्षण सेवा केंद्र बंद असल्याने तालुकावासियांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली असून ते पुन्हा केव्हा सुरू होईल त्याचीही निश्चिती नसल्याने तालुकावासीयांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

गेला आठवडाभर काही तांत्रिक बिघाडामुळे हे सुविधा केंद्र बंद असून त्यामुळे तालुकावासीयांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. आता हे बंद असलेले रेल्वे सुविधा आरक्षण केंद्र नेमके केव्हा पूर्ववत सुरू होईल सांगणे अवघड बनले आहे. रेल्वेने याची तत्काळ दखल घेऊन आरक्षण सुविधा केंद्रामधील निर्माण झालेला तांत्रिक बिघाड दूर करावा आणि बंद पडलेली सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी तालुकावासीयांमधून करण्यात आली आहे.

आरक्षण सुविधेचा फलकच नाही
राजापूर शहरातील पोस्ट कार्यालयात रेल्वे आरक्षण सुविधा केंद्र सुरू झाले खरे मात्र त्याबाबतचा कोणताच फलक संबंधित पोस्ट कार्यालयाबाहेर नसल्याने आरक्षणासाठी येणाऱ्या प्रवाशांना नाहक इकडेतिकडे फिरावे लागत आहे. प्रवाशांना समजेल असा रेल्वे आरक्षण सुविधा केंद्राचा फलक पोस्ट कार्यालया बाहेर लावण्यात यावा, अशी ही मागणी आता तालुकावासीयांमधून करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:10 PM 02/Dec/2024