सापांच्या संवर्धनसाठी जनजागृती आवश्यक : डॉ. हरीश बाबर

चिपळूण : साप हा आपल्या सगळ्यांच्याच कुतूहलाचा आणि भीतीचा विषय राहिलेला आहे. सापाबद्दल आजही समाजामध्ये त्यामध्ये शिक्षित अशिक्षित सर्वच लोकांमध्ये अनेक गैरसमज पाहावयास मिळतात. हेच गैरसमज दूर व्हावेत आणि त्याबद्दलची परिपूर्ण माहिती मिळावी व सापांचे संवर्धन व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीची आवश्यकता आहे, असे मत प्रा. डॉ. हरीश बाबर यांनी व्यक्त केले. डी. बी. जे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबिर मौजे चिंचघरी (गणेशवाडी) येथे संपन्न होत या शिबिरात ‘सर्पविश्व’ या विषयावरील व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

या व्याख्यानादरम्यान डॉ. बाबर यांनी सापांचे जीवनचक्र, सापांचा अधिवास व पर्यावरणातील महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. महाराष्ट्रामध्ये विशेषतः कोकणामध्ये आढळणाऱ्या विषारी व बिनविषारी सापांच्या प्रजातींची सचित्र माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. त्यामध्ये प्रामुख्याने नाग, मण्यार, घोणस व फुरसे या विषारी सापांच्या प्रजातींबाबतची सचित्र आणि सविस्तर माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.

साप हा अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा सजीव असून, सापाबद्दल असलेल्या भीती आणि गैरसमज मुळे आज सापांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांनी सापाबद्दलची शास्त्रशुद्ध माहिती घेऊन सापांच्या प्रजातींचा होणारा हास टाळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.

या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. नामदेव तळप, प्रा. राजकुमार पाटील प्रा. दत्तप्रसाद चव्हाण, प्रा. प्रेमकुमार शिवगण राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अरूण जाधव, सल्लागार प्रा. विनायक बांद्रे, सहकार्यक्रमाधिकारी प्रा. विठ्ठल कोकणी, प्रा. प्रदीप वळवी प्रा. सौ सुजाता खोत प्रा. सौ. कांचन तटकरे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रिया खातू, व प्रमुख वक्त्यांचा परिचय कु. शुभम कदम यांनी तर आभार प्रदर्शन कु. याज्ञी फाटक यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:38 PM 02/Dec/2024