आसमंत बेनवोलेन्स फाउंडेशनतर्फे चार दिवसीय सागर महोत्सवाचे आयोजन

पुणे : मानवी उत्क्रांतीत सागरांचे महत्त्व अपार आहे. यासह आधुनिक अर्थव्यवस्था आणि मानवी स्वास्थ्य यातही मोठे योगदान आहे. मात्र, या गोष्टीची जाणीव सामान्य माणसांना असतेच असे नाही.

किंबहुना, समुद्रापासून दूर असणाऱ्या नागरिकांना तर याची कल्पना देखील नसते. त्यामुळे सागरी परिसंस्था आणि त्याचे महत्त्व सामान्य नागरिकांपर्यंत नेणे आणि त्यातून संवर्धनाची प्रेरणा देणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आसमंत बेनवोलेन्स फाउंडेशनतर्फे ‘सागर महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक आणि संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी दिली.

हा महोत्सव ९ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालय येथे होणार आहे. सर्व नागरिकांना मोफत या महोत्सवाचा आनंद घेता येणार आहे. यामध्ये आंतर महाविद्यालयीन स्पर्धा, चित्रपट प्रदर्शन, पथनाट्य, खारफुटी अभ्यास दौरा, प्रशिक्षण, खडकाळ किनारा अभ्यास सहल, वालुकामय किनारा अभ्यास सहल, विविध विषयावर व्याख्यान अशा विविध उपक्रमांचा सहभाग असणार आहे. या महोत्सवामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाच्या पर्यावरण विज्ञान विभागाचे ६५ विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

यामध्ये रत्नागिरीचे गोगटे जोगळेकर महाविद्यालय, मत्स्य महाविद्यालय, गोव्याची राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था, पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटचा सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट विभाग, इकॉलॉजिकल सोसायटी पुणे, भारतीय नौसेना आणि मुंबईच्या कोस्टल कॉन्सरवेशन फाउंडेशनचा सहभाग आहे. त्यामुळे पुणेकरांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सागर महोत्सवामध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन आसमंततर्फे करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:39 02-12-2024