खेड : खेड रेल्वेस्थानकाच्या सुशोभीकरणासह रस्ता रुंदीकरणाच्या लोकार्पणानंतर अपूर्णावस्थेत असलेली अंतर्गत कामे पूर्ण करण्याच्यादृष्टीने संबंधित ठेकेदाराकडून हालचाली सुरू आहेत; मात्र सुशोभीकरणाच्या लोकार्पणानंतर रेल्वेस्थानकाबाहेरील परिसराची स्वच्छता करण्यात आली नसल्याची बाब समोर आली आहे. या परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले असून, प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. येथील सार्वजनिक बांधकाम खात्याकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे.
रेल्वेस्थानकाच्या सुशोभीकरणासह रस्ता काँक्रिटीकरणासाठी ९ कोटी ९० लाख रुपयांचा निधी खर्चुन नवा साज देण्यात आला आहे. मात्र लोकार्पणानंतर स्थानकाबाहेरील परिसराची स्वच्छता करण्यात आली नसल्याची बाब अधोरेखित झाली आहे. स्थानकाबाहेरील परिसरात सगळीकडेच धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या परिसराची स्वच्छता करायची कुणी, यावरून एकमेकांकडे बोट दाखवले जात आहे. रेल्वे प्रशासनाकडून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे स्वच्छतेबाबत सातत्याने सूचना केल्या जात असतानाही दाद दिली जात नसल्याचे समजते. याचा नाहक त्रास प्रवाशांना बसत आहे. सर्वत्र पसरलेल्या धुळीच्या साम्राज्यामुळे सुशोभीकरणानंतरही परिसर बकाल बनत चालला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:05 PM 02/Dec/2024














