रत्नागिरी : निवखोल शाळा क्र. १७ ची इमारत बनलेय धोकादायक

रत्नागिरी : शहरातील निवखोल भागातील शाळा क्र. १७ मध्ये सर्व वर्ग खोल्या अतिशय जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत असल्याने या ठिकाणी अक्षरशः विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत. शहरातील शाळांची अशी अवस्था असेल, तर ग्रामीण भागात काय स्थिती असेल, असा सवाल उपस्थित होत आहे.

शिक्षण हा देशाच्या भविष्यासाठी महत्त्वाचा स्रोत असून देशाचा सर्वांगीण विकास यावर अवलंबून आहे. प्रत्येक मुला-मुलींचे शिक्षण व्हावे, यासाठी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा सुरू केला. मात्र, या शाळांमध्ये प्रशासन कितपत लक्ष देते, हादेखील महत्वाचा प्रश्न आहे. शहरातील निवखोल येथील १७ नंबर शाळेत इमारतीची अवस्था बिकट बनली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडण्याअगोदर यावर कारवाई करावी, अशी मागणी होताना दिसत आहे.

या शाळेची इमारत पूर्णपणे जीर्ण झाल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी तर इमारतीच्या खिडकीवर गवत उगवल्याचे दिसून येत आहे. शाळेची साफसफाईसुद्धा नगर परिषदेचे कर्मचारी करत नसल्याचे दिसून येत आहे. शौचालयाची अवस्थादेखील बिकट आहे. विशेष म्हणजे इमारतीवर गवत उगवल्याने सरपटणारे विषारी प्राणी शाळेमध्ये प्रवेश करु शकतात. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या भागातील लोकप्रतिनिधींचा याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. रस्ते तसेच इतर गोष्टींवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होत असताना इमारतीवर हजारो रुपयाचा खर्चसुद्धा होत नाही ही शोकांतिका आहे.

बहीण लाडकी विद्यार्थी मात्र दोडके!
शासनाने काही महिन्यांपूर्वी लाडकी बहीण योजना काढून तब्बल दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यात वर्ग केले. विद्याथ्यांना मात्र अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मोफत गणवेशाचे तर तीन तेरा वाजले आहेत. काही शाळांमध्ये ते अजूनही मिळालेले नाही. यामुळे ‘बहीण लाडकी मात्र विद्यार्थी दोडके’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:44 PM 02/Dec/2024