रत्नागिरी : सिद्धार्थ गौतमांचा बुद्धापर्यंतचा प्रवास साकारणारे महानायक नाटक सादर

रत्नागिरी : शुद्धोधन राजाच्या पोटी जन्माला आलेल्या सिद्धार्थ गौतमाचा भगवान बुद्ध होण्यापर्यंतचा प्रवास साकारणारे महानायक नावाचे नाटक रत्नागिरीत हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या पाचव्या दिवशी सादर करण्यात आले.

रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहामध्ये महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजित केलेली ६३ वी राज्य मराठी नाट्य स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेत रविवारी, १ डिसेंबर रोजी रत्नागिरीच्या प्रायोगिक थिएटर्स असोसिएशनने महानायक नावाचे नाटक सादर केले. नाटकाचे लेखन, प्रकाशयोजना, नेपथ्य आणि गौतम बुद्धाची मध्यवर्ती भूमिका अमर अरविंद खामकर यांनी साकारली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील चित्रकथी या लोककलेचा आधार घेऊन संपूर्ण नाटक सादर करण्यात आले आहे. चित्रकथीमध्ये एकेक चित्र दाखवून त्याविषयीची माहिती निवेदक सांगत असतो. त्यानंतर दुसरे चित्र दाखविले जाते. पिंगुळी येथील परशुराम गंगावणे यांना याच कलेच्या जोपासनेसाठी पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. त्या लोककलेचे सूत्र अवलंबून महानायक नाटक साकारण्यात आले आहे. बुद्धाच्या जीवनावरील विविध चित्रे सुरुवातीला फ्लेक्सच्या फलकांमधून दाखवली जातात आणि त्यानंतर त्या चित्रातील कथा नाटकातील विविध पात्रे साकारतात, असे या नाटकाचे स्वरूप आहे.

शुद्धोधन राजाला गौतम हा आपला पुत्र उत्तराधिकारी व्हावा, असे वाटत असते. पण युद्धामध्ये झालेली मनुष्यहत्या, पशुपक्ष्यांची हत्या पाहिल्यानंतर गौतम व्यथित होतो. झाडांची पाने, फुले तोडल्यानंतर तसेच पशुपक्ष्यांची हत्या पाहिल्यानंतरही त्याला खूप वाईट वाटते. त्यामुळेच युद्ध म्हणजेच राज्यकारभार असेल तर तो आपल्याला नको आहे, असे गौतमांनी ठरविलेले असते. आई-वडील, पत्नी यशोधरा, पुत्र राहूल या सर्वांसह राज्यत्याग करून तो तपश्चर्येसाठी निघून जातो.

सात वर्षांच्या तपश्चर्येनंतर त्याला ज्ञान प्राप्त होते. हा सारा जीवनपट नाटकात दाखविण्यात आला आहे. अंगुलमालाची कथाही नाटकात दाखवण्यात आली आहे. खूप मोठा विषय नाटकात घेण्यात आला आहे. पण नाटक ओघवते राहत नाही. प्रवेशांची संख्या भरपूर आहे. त्यामध्ये बराच वेळ जातो. त्यामुळे नाटक मनाची पकड घेत नाही. प्रवेशांची संख्या कमी करायला हवी. लेखनाच्या बाबतीत म्हणजे संवादांच्या बाबतीत तसेच तंत्रासह अनेक बाबतीत खूप काही सुधारणा करायला नाटकात वाव आहे.

मयूरा डोमणे, नूतन कोरगावकर, अर्पिता खामकर, वैदेही विनायक सावंत, विनायक भागवे, प्रशांत महाकाळ, सुमेध कांबळे, रवींद्र कांबळे,, परिमल कुलकर्णी, दिनेश शिंदे, श्रुती पवार, सुनील जाधव, वेदांत झगडे, श्रेया घगवे यांनी नाटकातील विविध भूमिका साकारल्या आहेत. नरेश पांचाळ यांनी रंगभूषा तर शुभम घाग यांनी तांत्रिक बाजू सांभाळली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 AM 03/Dec/2024