◼️ झाडगाव ते नाचणेपर्यंत १५ मालमत्ता जमीनदोस्त
रत्नागिरी : मिऱ्या- नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये अडथळा ठरलेली १५ बांधकामे पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आली. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी ही कारवाई करण्यात आली. जेसीबीने ही घरे पाडून रुंदीकरणाचा मार्ग मोकळा केला आहे.
मिऱ्या-नागपूर या १६६ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मिऱ्या येथून हे काम सुरू करण्यात आले आहे. परटवणेपर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले आहे; परंतु तेथून पुढे मात्र रुंदीकरणाचे काम रखडले आहे. अनेक ठिकाणी चौपदरीकरणासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनामधील अनधिकृत बांधकामे हटवण्यात आलेली नाहीत. त्यामुळे परटवणे-झाडगाव ते नाचणेपर्यंत रुंदीकरणाचे काम संथपणे सुरू आहे. ही बांधकामे हटवण्याबाबत ठेकेदार कंपनीने जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी आणि प्रातांधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार म्हात्रे यांनी सोमवारी झाडगाव, परटवणे, नाचणे येथील अनधिकृत बांधकामे हटवण्याची मोहीम हाती घेतली.
पोलिस बंदोबस्तात जेसीबीने ही अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. अनेक दिवसांपासून या बांधकामामुळे रस्त्याच्या रुंदीकरणाला गती मिळत नव्हती. झाडगाव ते नाचणे दरम्यानचे एकूण १५ बांधकामे त्याला अडसर ठरत होती. सुरुवातीला झाल्यानंतर घरमालकांनी काहीसा विरोध केला; परंतु पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे त्यांचा विरोध मावळला.
मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी भूसंपादन करण्यात आले आहे. या भूसंपादनामधील काही अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली नव्हती. जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही १५ बांधकामे हटवण्यात आली. – राजाराम म्हात्रे, तहसीलदार, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 03-12-2024













