चिपळूण : टेरव येथील कोळसा भट्टी प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

चिपळूण : टेरव येथील ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर वन विभागाने टेरव येथील जंगलात धुमसत असणाऱ्या कोसळा भट्टयांवर धाड टाकून येथील लाकूड साठा आणि कोळसा जप्त केला आहे तर या प्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

टेरव येथील जंगलात अनेक महिने कोळसा भट्टया धगधगत असल्याची तक्रार येत होती. दरवर्षी पावसाळ्यानंतर या जंगलात कोळसा भट्टया लावल्या जातात. त्यामुळे गावातील काही जागरूक नागरिकांनी या विरोधात आवाज उठविला होता व वन विभागाला लेखी निवेदन देत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार वन विभागाने शनिवारी (दि.३०) टेरव येथील जंगलामध्ये कोळसा भट्टयांवर धाड टाकली.

या धाडीत कोळसा जप्त करण्यात आला असून टेरव येथील संतोष कदम, बाबुराव कदम आणि नागेश कदम या तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत. संतोष कदम यांनी विनापरवाना जंगलतोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडून ४७ घ. मी. लाकूड जप्त केले आहे तर विनापरवाना आणि कोळसा भट्टी लावण्यास बंदी असताना देखील कोळसा भट्टया लावल्याप्रकरणी बाबुराव कदम व नागेश कदम यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. येथील परिक्षेत्र वन अधिकारी खान यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये कोळसा जप्त करण्यात आला असून कारवाईचा तपशील वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. या कारवाईनंतर तरी टेरवमधील कोळसा भट्टया विझतील का? असा प्रश्न उपस्थित होते आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 03/Dec/2024