दापोलीतील स्मृती ग्रंथालय दुरुस्तीचा प्रस्ताव वर्षानुवर्षे धूळखात

दापोली : दापोली शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या स्मृती ग्रंथालयाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव वर्षानुवर्षे धूळखात पडला आहे. या कामासाठी निधी मंजूर झाला आहे. परंतु, या ठिकाणी सक्षम अधिकारी नसल्याने हा प्रस्ताव रखडला आहे. पाठपुरावा करण्यासाठी या ठिकाणी सक्षम अधिकारीच नसल्याने कोणीही पाठपुरावा करताना दिसत नाही. त्यामुळे हा निधी परत जाण्याची शक्यता आहे.

तत्कालीन काँग्रेस सरकारने सन १९९६ मध्ये या ग्रंथालयाची उभारणी केली; मात्र त्यानंतर या ग्रंथालयाकडे एकही लोकप्रतिनिधींना बघण्यास सवड मिळाली नाही. अशी खंत देखील दापोलीकर व्यक्त करत आहेत.

ग्रंथालयाचा कारभार सध्या लातूर येथून हाकला जात आहे. ग्रंथालयात अधिकारी नसल्याने प्रभारी ग्रंथालय निरीक्षकांच्या माध्यमातून हा कारभार सुरू असल्याने कार्यालयीन कामकाजांचा खोळंबा होत आहे.

लोकांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी येथे दोन एकर जागेमध्ये हे ग्रंथालय उभारण्यात आले आहे.

परंतु, या ठिकाणी अनेक गैरसोयी पाहायला मिळत आहेत. ग्रंथालयात कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने ग्रंथालयाची दुरवस्था झाली आहे. ग्रंथालयात गेल्या अनेक वर्षांपासून ग्रंथपाल वर्ग २ हे पद कायमस्वरूपी भरले जात नाही. त्यामुळे या पदाचा पदभार इतर ग्रंथपालाकडे सोपवला जातो.

कार्यालयीन कामकाजात अडचणी
ग्रंथालयाचे अधिकारी नाईक यांनी रत्नागिरी येथे विनंती बदली करून घेतल्यामुळे दापोली ग्रंथालयातील अधिकारी पद रिक्त आहे. त्यामुळे ग्रंथपाल वर्ग २ चा पदभार ग्रंथालयाचे तांत्रिक कर्मचारी रा. ग. कोरे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. परंतु, रा. ग. कोरे यांची लातूर जिल्हा ग्रंथालयात ग्रंथालय निरीक्षक म्हणून बदली झाल्याने ते लातूर येथे हजर झाले. त्यामुळे पगार बिले, तसेच इतर कामे करताना अडचणी निर्माण होत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 03/Dec/2024