देवरूख प्रेरणा शहरस्तर संघाचा अभ्यासदौरा

साडवली : देवरूख नगरपंचायतीने स्थापन केलेल्या प्रेरणा शहरस्तर संघातील सभासदांनी सावंतवाडी येथील सुंदरवाडी शहरस्तर संघाचे कामकाज पाहण्यासाठी अभ्यासदौरा केला. त्या वेळी कार्यालयीन कामकाज, केलेल्या कामांचे नियोजन या विषयी सविस्तर माहिती घेतली तसेच त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्धारही केला.

देवरूख नगरपंचायतीमार्फत प्रेरणा शहरस्तर संघाची २०२२ मध्ये स्थापना झाली आहे. या संघामार्फत सोनचैरीया शहर उपजीविका केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून, अभियानातील लाभार्थ्यांना उपजीविकेच्या किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, गटांच्या उत्पादनांना मार्केट उपलब्ध करून देणे, नवीन गटांची स्थापना, प्रशिक्षण व बँक अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्याबरोबरच विविध प्रकारच्या ऑनलाईन सेवा दिल्या जात आहेत. त्यामध्ये शहरस्तर संघ कार्यकारिणा समिती सदस्यांनी प्रभावीपणे काम करावे, या उद्देशाने वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार व प्रशासक तथा मुख्याधिकारी देवरूख नगरपंचायत चेतन विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणा शहरस्तर संघाचा अभ्यासदौरा सावंतवाडी येथील सुंदरवाडी शहरस्तर संघाचे कामकाज पाहण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.

या दौऱ्यासाठी मुख्याधिकारी विसपुते यांनी मार्गदर्शन केले. या दौऱ्यामध्ये सावंतवाडी येथील सुंदरवाडी शहरस्तर संघाचे कार्यालयीन कामकाज, संघामार्फत देण्यात येणाऱ्या सुविधा, गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राबवलेली रणनीती त्याचबरोबर संघाचे उत्पादनवाढीसाठी करण्यात येत असलेले नियोजन इत्यादीबाबत महिलांनी सखोल माहिती घेतली. या वेळी सावंतवाडी नगर पालिकेचे शहर अभियान व्यवस्थापक एकनाथ पाटील व संघाच्या उपाध्यक्षा मनिषा बांदेकर यांनी सविस्तर माहिती दिली. दौऱ्यामध्ये प्रेरणा शहरस्तर संघाची कार्यकारिणी समिती सदस्य, संघाच्या व्यवस्थापिका तसेच समुदाय संसाधन व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. अभ्यास दौरा यशस्वी करण्यासाठी देवरूख नगरपंचायतीचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी कुमार सरवदे यांनी परिश्रम घेतले व अभ्यास दौरा यशस्वी केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 PM 03/Dec/2024