साडवली : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला विलंब झाल्यामुळे संगमेश्वर-देवरूख- साखरपा-दाभोळे वाटूळ मार्गाचा पर्याय अनेक वाहनचालकांकडून स्वीकारला जातो. सुरुवातीला फक्त आंबा आणि मासे वाहतूक करणारी वाहने या मार्गावरून जात होती. आता सर्वच प्रकारची वाहने जात आहेत; मात्र सह्याद्रीनगर येथील इंग्रजी वाय आकाराच्या आलेल्या दोन रस्त्यावर मार्गदर्शक फलकच नसल्यामुळे वाहनचालकांची फसगत होत आहे. अनेकवेळा मार्ग चुकल्यामुळे वाहनचालकांना माघारी यावे लागते. याकडे प्रशासन गांभीयनि पाहणार आहे का, असा प्रश्न वाहनचालकांकडून व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे शहरात वाहतूककोंडी होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांचे महत्व वाढलेले आहे. संगमेश्वरहून राजापूर वाटूळला जाण्यासाठी देवरूख मार्गाचा अवलंब केला जातो. त्यामुळे देवरूखात वाहतूककोंडी होत असून, त्याचा फटका स्थानिक नागरिकांना होत आहे, प्रशासनाला जागे करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला. सह्याद्रीनगर इंग्रजी वाय पॉइंट येथे मोठ्या अक्षरात मार्गदर्शक फलक बसवा, असा फलक लावण्यात आला आहे. अनोळखी वाहनचालक देवरूख बायपासऐवजी चुकून देवरूख शहरात प्रवेश करतात. विशेषतः मोठ्या अवजड वाहनांमुळे परिस्थिती बिकट होते. मार्गदर्शक फलकाअभावी मार्ग चुकल्यामुळे शहरात वाहतुकीचा बोजवारा उडतो.
स्नेहपूर्ण गाव अशी उपाधी
देवरूखमधील नागरिक तसेच सोळजाई देवीचे भक्तगण या परिस्थितीत वाहनचालकांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सहकार्य करतात. त्यामुळे येणारे पर्यटक किंवा वाहनचालकांकडून देवरूखला स्नेहपूर्ण गाव, अशी उपाधी देतात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 PM 03/Dec/2024














