संगमेश्वर रेल्वेस्थानकात थांबा न दिल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा

रत्नागिरी : जुलै महिन्यात झालेल्या संयुक्त बैठकीत तीन गाड्यांच्या थांब्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देणाऱ्या कोकण रेल्वे प्रशासनाने पाच महिन्यात मागणी पूर्ण केली नाही. त्यामुळे येत्या प्रजासत्ताक दिनी बेमुदत उपोषण सुरु करण्याचा इशारा निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर या ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी दिला आहे.

जिमन यांनी कोकण रेल्वे प्रशासनाला तसे निवेदन दिले असून, आता महिनाभरात मागणी पूर्ण न झाल्यास थांब्यासाठीचा संघर्ष तीव्र करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे काही दिवस शांत होतो; परंतु कोकण रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या मागणीला गांभीयनि घेताना दिसत नाही. संगमेश्वर-चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून झालेल्या संयुक्त बैठकीत कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार स्थानकात झा यांनी संगमेश्वर रेल्वेगाडयांना थांबे देण्याच्या मागणीकडे व्यक्तीगत लक्ष घालण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासानावर विश्वास ठेवून १५ ऑगस्टला होणारे उपोषण स्थगित केले; परंतु बैठकीला ५ महिने होत आले तरीही कोकण रेल्वे प्रशासन कोणतीही हालचाल केलेली नाही. दरम्यान, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना भेटून या मागणीचे निवेदनही दिले होते. त्यामुळे आता शेवटचे निवेदन देऊन मागणी पूर्ण होत नसेल तर बेमुदत उपोषणाशिवाय पर्याय उरणार नाही, असे त्यांनी सांगितले.

संगमेश्वर तालुक्यातील जनतेच्या रेल्वेविषयीच्या भावना तीव्र आहेत. संगमेश्वर येथून रेल्वेचा उपयोग करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आम्ही पुकारलेल्या उपोषणात जनताही उत्स्फूर्तपणे भाग घेईल. – संदेश जिमन, संगमेश्वर

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 03/Dec/2024