राजापूर : विधानसभा निवडणूक आचारसंहितेत रखडलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील रिक्त पदांवर डीएड, बीएड उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात नियुक्ती देताना प्रशासनाकडून संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करताना रहिवासी दाखल्याचीही तपासणी व्हावी, अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख आणि जिल्हा परिषद माजी शिक्षण सभापती दीपक नागले यांनी केली आहे. याबाबत तहसीलदार विकास गंबरे यांची नागले यांनी भेट घेतली.
वयोमानानुसार निवृत्ती, जिल्हा बदली यासह रखडलेली शिक्षक भरती आदी विविध कारणांमुळे जिल्हा परिषद शाळामंध्ये मोठ्या संख्येने शिक्षकपदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होत आहे. याची दखल घेत सहा महिन्यांपूर्वी राज्य शासनाने पवित्र पोर्टलद्वारे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती दिली. त्यानंतरही अनेक शिक्षकपदे रिक्त आहेत. काही शाळांमध्ये एकच शिक्षक कार्यरत आहे. त्यामुळे रिक्त पदांचा प्रश्न गंभीर आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने रिक्त पदांवर कंत्राटी शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची जिल्हा परिषदेकडून अंमलबजावणीही सुरू झाली. इच्छुकांकडून अर्ज स्वीकारणे, हरकती मागवणे या प्रक्रियेला विलंब झाला. त्यामध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली. निवडणूक झाल्यानंतर रखडलेली नियुक्ती प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. कंत्राटी शिक्षक भरतीत स्थानिक डीएड, बीएड धारकांना प्राधान्य मिळणे गरजेचे आहे. काही परजिल्ह्यातील शिक्षकांच्या सौभाग्यवतींनी अर्ज सादर केले आहेत. झालेल्या भरतीत स्थानिकांचा टक्का कमीच असल्यामुळे किमान कंत्राटी भरतीत तरी स्थानिक उमेदवारांना संधी मिळणे गरजेचे आहे. अनेक डीएड, बीएड झालेले उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. कंत्राटी भरतीच्या रूपाने अनुभवही मिळू शकतो. शिक्षक नियुक्ती देताना कागदत्रांची पडताळणीसह रहिवासी दाखल्याची तपासणी करा, अशी मागणी नागले यांनी केली आहे.
कंत्राटी भरतीतून अनुभव
नुकत्याच झालेल्या भरतीत स्थानिकांचा टक्का कमीच असल्यामुळे किमान कंत्राटी भरतीत तरी स्थानिक उमेदवारांना संधी मिळणे गरजेचे आहे. अनेक डीएड, बीएड झालेले उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. कंत्राटी भरतीच्या रूपाने अनुभवही मिळू शकतो.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:31 PM 03/Dec/2024














