ओडिशा येथील कंपनीतील दुर्घटनेत रत्नागिरीतील तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी : ओडिशातील एका कंपनीत एका कंपनीत गॅस गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत जिल्ह्यातील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे निवळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गॅस गळती होऊन तरुणाचा गुदमरून मृत्यू झाल्याचे समजते.

रत्नागिरी एमआयडीसी परिसरात असलेल्या एका मोठ्या कंपनीचा एक प्लांट ओडिशाला काही वर्षांपूर्वी शिफ्ट झाला होता. हा प्लांट शिफ्ट झाल्यानंतर रत्नागिरीत प्लॉटमध्ये काम करणारे अनेक कामगार ओडिशाला गेले होते. ते त्याच प्लांटमध्ये काम करत होते.

शेकडोंच्या संख्येने येथील स्थानिक कामगार ओडिशाला गेले आहेत. परवा ओडिशातील त्या प्लांटमध्ये मोठी दुर्घटना झाल्याची माहिती रत्नागिरीत धडकली. या माहितीनंतर कामगारांच्या कुटुंबांमध्ये घबराट निर्माण झाली होती. जो तो आपल्या नातेवाइकांशी संपर्क साधत होता. अनेकांचे फोन बंद आल्याने त्यांची भीती अधिकच वाढली नेमकं काय घडलंय, हे कोणालाच कळत नव्हते; मात्र काहीतरी दुर्घटना झालीय याची माहिती कुटुंबीयांना मिळाली होती.

या दुर्घटनेबाबत ओडिशातील काही कामगारांशी संपर्क साधण्याचा प्रयन झाला; मात्र त्या कामगारांनी माहिती देण्यास नकार दिला, अखेरीस ज्या गावातील तरुणीचा मृत्यू झालाय त्या गावात ओडिशामधून फोन आला आणि सारा प्रकार पुढे आला, मिळालेल्या माहितीनुसार ओडिशाला स्थायिक झालेल्या त्या प्लांटमध्ये गॅस वाहून नेणाऱ्या पाईपलाईनचा व्हॉल्व अचानक फुटला आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्या जिल्ह्यातील एका तरुणाच्या अंगावर सारा गॅस आला. त्यामध्ये तो गुदमरला आणि त्यातच त्या तरुणाचा मृत्यू झाला. या वृत्ताला संबधित गावातील काही गावकऱ्यांकडून दुजोरा मिळाला. काल त्या तरुणाचा मृतदेह रत्नागिरीत आणणार असल्याची माहितीदेखील काही कामगारांनी दिली.

नातेवाइकांत घबराट
ओडिशातील एका कंपनीत गॅस गळतीने दुर्घटना झाल्याचे वृत्त रत्नागिरी जिल्ह्यात पसरले. येथील अनेक तरुण ओडिशा येथील विविध कंपन्यामध्ये काम करतात. त्यामुळे दुर्घटना नेमकी कोठे झाली. त्या कंपनीत आपली मुले तर नाहीत ना? अशी भीती नातेवाइकांना वाटू लागली. त्यांच्याकडून फोनद्वारे संपर्क साधण्याचे काम सुरू होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 04/Dec/2024