रत्नागिरी : रत्नागिरी शहरात रस्त्यावर कुठेही फळे, भाजी व इतर वस्तूंची दुकाने थाटणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात मंगळवारी नियोजन करण्यात आले. गुरुवार किंवा शुक्रवारपासून अशा विक्रेत्यांवर कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण हटाव पथकाचे तथा मालमत्ता विभागाचे अधिकारी जितेंद्र विचारे यांनी सांगितले.
रत्नागिरी नगर परिषदेत गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रशासक आहे. अधिकारी, कर्मचारी वर्गही फारच कमी आहे. नगरसेवक आणि पदाधिकारीसुद्धा नसल्याने रस्त्याच्या कडेला व्यवसाय थाटणाऱ्यांवर कारवाई करण्यास मर्यादा आल्या.
परंतु आता रत्नागिरी शहरातील रस्ते, प्रशासकीय इमारती नव्याने होत आहेत. अशावेळी जागा मिळेल तिथे भाजी, फळे विक्रेते आपली दुकाने थाटून बसले आहेत. शहरातील विविध मार्गावर अनेक फेरीवालेसुद्धा पादचारी आणि वाहतुकीला अडथळा होईल असे व्यवसाय करत आहेत. या सर्व बेशिस्तपणामुळे शहराचे विद्रुपीकरण होवू लागल्याचे चित्र समोर आले.
यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर माजी पालकमंत्री उदय सामंत यांनी कारवाई संदर्भातील सूचना केल्या. त्यानुसार कारवाईच्या नियोजनासाठी मंगळवारी बैठक झाल्याचे मालमत्ता विभागाचे अधिकारी विचारे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 04/Dec/2024














