रत्नागिरी : पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून जिल्हा परिषद कृषी विभागातर्फे दरवर्षी बंधारे उभारले जातात. यावर्षीही लोकसहभागातून १० हजार बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले. बंधारे बांधण्याचा शुभारंभ करण्यात आला आहे.
जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असला तरी भौगोलिक परिस्थितीमुळे दरवर्षीच पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. दोनशेपेक्षा जास्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. एप्रिल आणि मे महिन्यात अनेक गावांत पाणीबाणी असते. गावातून वाहणारे नाले, वहाळ आणि उपनद्या चावर तात्पुरते बंधारे बांधून त्या पाण्याचा उपयोग करण्यात येत आहे. श्रमदानातून हे बंधारे उभारले जात आहेत.
कोकण कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या विजय बंधाऱ्यांचे मॉडेल पाणी साठवून ठेवण्यासाठी अधिक उपयुक्त असल्याचे दिसून आले. सिमेंटच्या पोत्यांचा उपयोग करून हे बंधारे उभारले जातात. यंदा नोव्हेंबर महिन्यापर्यंत मोसमी पाऊस सुरू होता. त्यामुळे गावागावातून वाहणारे नदी, नाल्यांचे प्रवाह वेगवान होते. परिणाम प्रत्यक्ष बंधारे बांधण्यासाठी डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे.
प्रत्येक गावाला दहाचे लक्ष्य दिले होते. जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती असून १ हजार ५०० गावे आहेत. बंधाऱ्यांतील पाण्याचा उपयोग सिंचनासाठी, कपडे धुणे, गाई गुरांसाठी केला जातो. तसेच बंधारा बांधल्यानंतर अडलेले पाणी जमिनीत जिरते आणि किनाऱ्यावरील विहिरींची पाणी पातळीही वाढण्यास मदत होते.
एप्रिल, मे महिन्यात कडाक्याच्या उन्हाळ्यात पाणी पातळी कमी होते. काही ठिकाणी विहिरी पूर्णतः कोरड्या पडतात. त्यावेळी पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. बंधाऱ्यातील पाण्यामुळे अनेक विहिरींचे पाणी उशिरापर्यंत वापरण्यास मिळत आहे. काही गावांमध्ये कच्चे बंधारे विहिरींची पाणी पातळी वाढविण्याच्या उद्देशानेच उभारले जातात. गेल्या दोन वर्षात गावागावात पाणी योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत.
लोकसहभागातून व लोकचळवळीच्या माध्यमातून ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये महिला बचतगट, शेतकरी गट, महाविद्यालयीन विद्यार्थी, ग्रामस्थ यांच्यावर भर देण्यात येणार आहे.
या बंधाऱ्याचा शुभारंभ जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी रत्नागिरी तालुक्यातील विल्ये येथे केला. यावेळी ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकरी अधिकारी राहुल देसाई, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, सहायक गटविकास अधिकारी केतन शेळके, कृषी अधिकारी प्रमोद बागडे आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 04/Dec/2024














