ईव्हीएम विरोधात तीव्र आंदोलन छेडणार : सुरेश भायजे

सावर्डे : ईव्हीएमद्वारे बनावट मतदान होऊन देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. यापुढील निवडणुकीत ईव्हीएम पूर्णपणे रद्द करण्यात यावे, यासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी माहिती बळीराज सेनेचे उपाध्यक्ष सुरेश भायजे यांनी दिली.

कासे (ता. संगमेश्वर) येथे झालेल्या बळीराजा पूजन कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, बळीराजा सेनेचे उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक हे श्रीवर्धन मतदार संघातून विधानसभेसाठी उभे राहिले होते. गेली २५ वर्षे शिवसेनेत, दहा वर्षे भाजपत तर गेली दोन वर्षे बळीराज सेनेत प्रमुख पदावर कार्यरत होते; मात्र त्यांना फक्त ४९० मते मिळाली होती. यावर ते प्रचंड नाराज होते. ईव्हीएम घोटाळ्यामुळेच कमी मते मिळाल्याचा आरोप त्यांनी निवडणूक आयोगाकडे लेखी स्वरूपात दिला आहे. त्यांनी वारंवार सोशल मीडियावरही ईव्हीएमबाबतीत संशय व्यक्त केला होता. अशातच त्यांचे दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराने निधन झाल्याने त्यांचा देशातील पहिला बळी ईव्हीएमने घेतल्याचा आरोप भायजे यांनी केला. त्यांना खरी श्रद्धांजली म्हणजे या पुढील निवडणुकीत ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेणे हाच होय. ईव्हीएमद्वारे होणारे मतदान बंद करण्यासाठी शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारणार असल्याचे भायजे यांनी सांगितले.

बळीराज प्रतिष्ठान कासे पिंपळवाडीच्यावतीने नंदकुमार जड्यार यांच्या निवासस्थानी बळीराजा पूजनाचा कार्यक्रम झाला. त्या वेळी कोबनाक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी कुणबी समाजोन्नती संघाचे संगमेश्वर तालुकाध्यक्ष शरदचंद्र गीते, माजी सभापती नारायण भुरवणे व बळीराज सेनेचे तालुकाध्यक्ष नितीन लोकम यांनी मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 04-12-2024