संगमेश्वर : कसब्यातील प्राचीन कर्णेश्वर मंदिरात ६ ते ८ डिसेंबरला रंगणार कर्णेश्वर महोत्सव

रत्नागिरी : पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या सौजन्याने श्री कर्णेश्वर देवस्थान आणि कलांगण संगमेश्वर आयोजित श्री कर्णेश्वर महोत्सव (कला संगीत महोत्सव) यंदा ६ ते ८ डिसेंबर या कालावधीत संगमेश्वर तालुक्यातील कसब्यातील प्राचीन कर्णेश्वर मंदिराच्या प्रांगणात होत आहे. कर्णेश्वर महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून यावर्षीही वादन, नृत्य, गायन अशी संगीत मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे.

श्री कर्णेश्वर कला-संगीत महोत्सवाचा प्रारंभ शुक्रवार ६ डिसेंबर रोजी स्व. पं. गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रसिद्ध संवादिनी वादक आदित्य विद्याधर ओक यांच्या ‘संवादिनी एकलवादन’ मैफलीने होणार आहे आणि त्यांना तबला साथ लाभणार आहे ती आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबला वादक कोकणचे सुपुत्र प्रसाद पाध्ये यांची.

शनिवार ७ डिसेंबर रोजी सुप्रसिद्ध नृत्यगुरू सोनिया परचुरे यांच्या ‘नृत्यांजली’ या एकल कथ्थक नृत्याचे सादरीकरण करणार आहेत. त्यांना आशय कुलकर्णी (तबला), अमेय बिच्चू (संवादिनी), प्रथमेश तारळकर (पखावज), नागेश आडगावकर (गायन), हर्षिता मुळ्ये, ईशा गाडगीळ (पढंत) यांची साथ लाभणार आहे.

रविवार ८ डिसेंबर रोजी या महोत्सवाचा कळस चढवणार आहेत. गोव्याची सुप्रसिद्ध युवा गायिका जोडी मुग्धा गावकर आणि प्राची जठार यांच्या ‘स्वरसखी’ गायन मैफलीला हेरंब जोगळेकर (तबला), चैतन्य पटवर्धन (संवादिनी), मंगेश चव्हाण (पखावज) यांची साथ लाभणार आहे. या गायन मैफलीचे निवेदन रत्नागिरीतील युवा निवेदिका पूर्वा पेठे करणार आहेत.

या संपूर्ण महोत्सवाच्या ध्वनी संयोजनाची जबाबदारी रत्नागिरीतील उदयराज सावंत (एस. कुमार साऊंड) सांभाळणार आहेत. तिन्ही दिवशी रात्री ९ वाजता कार्यक्रमास सुरुवात होईल. महोत्सवामध्ये मंदिराच्या प्रांगणात सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे आणि डी-कॅड कॉलेज, देवरूख यांचे चित्र आणि कला प्रदर्शन रसिकांना पाहता येणार आहे. हे प्रदर्शन यावेळी खास आकर्षण असणार आहे.
सर्व रसिक-भाविकांनी श्री कर्णेश्वर महोत्सवास उपस्थित राहून कला – संगीत महोत्सवाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन कलांगण संगमेश्वरने आपल्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 04/Dec/2024