रत्नागिरी : अनुदानित शाळेत बदली होण्याचा मार्ग मोकळा

रत्नागिरी : राज्यातील हजारो शिक्षक विनाअनुदानित शाळेत शिक्षण देत आहेत. त्या शाळेतून आता अनुदानित शाळेत बदली होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसे पत्र मुंबई येथील विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी राज्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना पाठविले आहे.

राज्यात हजारो शिक्षक विनाअनुदानित शाळेवर काम करत आहेत. त्या शाळेतील शिक्षकांचे अनुदान मिळणाऱ्या शाळेवर बदली होण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. त्या अडचणी शालेय शिक्षण विभागाने दूर केल्या आहेत. त्यामुळे विनाअनुदानित शाळेतून शिक्षकांना आता अनुदानित शाळेत बदली करून घेता येणार आहे. मात्र, त्या शाळेत शिक्षकांच्या जागा रिक्त असणे गरजेचे आहे.

दरम्यान, राज्यातील अनुदान मिळणाऱ्या बऱ्याच शाळेत शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्या जागेवर विनाअनुदानित शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी विविध शिक्षक संघटनांनी अनेक दिवसांपासून केली होती.

अखेर त्या मागणीला यश आले आहे. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा राज्यातील हजारो शिक्षकांना होणार आहे. तसेच अनुदानित शाळेत रिक्त असलेल्या जागेवर शिक्षक मिळणार आहे.

शिक्षण संस्था चालकांची चालबाजी
विभागीय शिक्षण उपसंचालकांनी विनाअनुदानित विभागातून अनुदानित शाळेत शिक्षकांची बदली करण्यासाठी राज्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना पत्र काढले आहे. मात्र, अनेक शाळांनी आपल्या शाळा, महाविद्यालयात असणारी शिक्षकांचे रिक्त पदे दाखविली नाहीत. त्यामुळे शिक्षण संस्था चालक चालबाजी करत असल्याचा दावा शिक्षकांतून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 AM 04/Dec/2024