खेड रेल्वेस्थानक परिसराची स्वच्छता

खेड : खेड रेल्वेस्थानकाच्या सुशोभीकरणाचे लोकार्पण दोन महिन्यांपूर्वी झाले होते; परंतु तेथील स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले होते. सर्वत्र धूळ असल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर या रेल्वेस्थानकाची स्वच्छता करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासांना दिलासा मिळाला आहे.

खेड रेल्वेस्थानकाच्या सुशोभीकरणासह रस्ता काँक्रिटीकरणासाठी ९ कोटी ९० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे या रेल्वेस्थानकाला नवा साज मिळाला आहे. सुमारे २९ वर्षानंतर रेल्वेस्थानकाचे रूपडे पालटल्यामुळे व्यक्त केले जात होते. सुशोभीकरणाचे काम सुरू असतानाच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या रेल्वेस्थानकाचे लोकार्पण करण्यात आले; परंतु त्यानंतर रेल्वेस्थानकाच्या बाहेरील परिसराची स्वच्छताच केली गेली नव्हती. ठिकठिकाणी वाळू, खडी याचे ढिगारे होते. सर्वत्र धूळ साचलेली होती. रंगांचे डबे, पिशव्या जिकडेतिकडे पसरून ठेवलेल्या होत्या. त्याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली येथील सुशोभीकरणासह रस्ता काँक्रिटीकरण केले गेले. त्यामुळे स्वच्छतेची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याचीच असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे होते. लोकार्पणानंतर परिसराची स्वच्छताच न केल्यामुळे प्रवाशांसह रिक्षा व्यावसायिकांना आणि रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत होता. याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत अखेर रेल्वेस्थानकाची स्वच्छता करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी निःश्वास सोडला आहे.

परिसरात अवतरली शिवसृष्टी
खेड रेल्वेस्थानक परिसरातील कलाकृतीसह रंगरंगोटी करण्यात आली असून, लायटिंगही केलेले आहे. रात्रीच्यावेळी दिव्यांनी स्थानक परिसर उजळलेला दिसतो. त्याचबरोबर परिसरात अवतरलेली शिवसृष्टी, कोकण रेल्वेच्या इंजिनाची छबी अन् जवळच उभारलेला राष्ट्रीय पक्षी मोर हे सर्व पाहण्यासाठी अनेकांची पावले आपसूकच रेल्वेस्थानकाकडे वळत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 04/Dec/2024