खेड : संजय कदमांची नाचता येईना अंगण वाकडे अशी अवस्था झाली असून ईव्हीएम मशीन वरती दोष देऊन स्वतःचे अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत, असा टोला शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे यांनी पत्रकार परिषदेत लगावला आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार संजय कदम यांनी दापोलीच्या प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन ईव्हीएम यंत्रांच्या बाबत शंका उपस्थित केली आहे. त्यांनी आंदोलन करताना शिवसेना आ. योगेश कदम व शिवसेना नेतृत्वावर देखील टीका केली. त्या टीकेचा समाचार खेड तालुक्यातील भरणे येथील शिवसेना कार्यालयात तालुका प्रमुख सचिन धाडवे यांनी २६ रोजी पत्रकार परिषद बोलवली होती.
यावेळी ते म्हणाले, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुनील तटकरे हे महायुतीचे उमेदवार होते. त्यादरम्यान अनंत गिते यांनी कुणबी समाजाला भावनात्मक आव्हान करत गीते यांच्या पारड्यात मते टाकली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत तटकरे यांच्यापेक्षा गिते यांना ८५०० हजार मते दापोली मतदारसंघात अधिक मिळाली त्यावेळी देखील ईव्हीएम मशीन मतदानासाठी वापरली गेली होती. मात्र तेव्हा मताधिक्य माझेच आहे असा साक्षात्कार झालेल्या संजय कदम अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले होते.
त्यांचा भ्रम विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुटला आहे. गेल्या पाच वर्षांत भरीव विकास कार्यावर विश्वास ठेवून सर्वांनी आ. योगेश कदम यांना मते दिली. भाजपा, राष्ट्रवादी, आरपीआय कार्यकर्ते यांनी मतदान केले त्यामुळे योगेश कदम २४ ते २५ हजार मताधिक्याने निवडून आले. त्यांच्या विजयाचे गणित स्पष्ट असताना दापोलीमधील मतदारांची दिशाभूल करण्याचा बालिश प्रयत्न संजय कदम करत आहेत, असे ते म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:27 PM 04/Dec/2024














