चिपळूण : शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक प्रदूषणाविषयी जागृती

चिपळूण : लोटे येथील घरडा केमिकल्स लिमिटेड आणि ओरिअर्थ नेचर फाउंडेशन पुणे यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक प्रदूषणाविषयी जागृती करण्यात आली. प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी लोटे परिसरातील २० शाळांमध्ये पथनाट्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना धडे देण्यात आले. याशिवाय ग्रामस्थांमध्ये जनजागृती होण्यासाठी गावातून प्रभातफेरी काढत प्लास्टिक प्रदू‌षणमुक्तीचा संदेश देण्यात आला.

घरडा केमिकल्स आणि ओरिअर्थ नेचर फाउंडेशन यांच्या वतीने पर्यावरण शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती केली जात आहे. लोटे परिसरातील एस. पी. एम. इंग्लिश मीडियम स्कूल, परशुराम, हुतात्मा अनंत कान्हरे विद्यालय आयनी, न्यू इंग्लिश स्कूल बोरज, सद्‌गुरू काडसिद्धेश्वर विद्यालय गुणदे आदी शाळेतील ४०० विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक प्रदूषणाविषयी जागृती करण्यात आली. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक प्रदूषणाविषयी जागृती झाल्यास पुढील काळात त्यास आळा बसणार आहे.

घरोघरी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर केला जातो; मात्र त्याचे विघटन होत नसल्याने समाजात त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. पर्यावरणावर त्याचे मोठे परिणाम होऊ लागले आहेत. त्याला आळा घालण्यासाठी शहरी तसेच ग्रामीण स्तरावरच पायबंद घालणे गरजेचे आहे, यासाठी पथनाट्याच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना प्रदूषणाविषयी माहिती देण्यात आली. प्लास्टिक प्रदूषणाचे तोटे, भविष्यात होणाऱ्या भयंकर परिणामांची जाणीवदेखील त्यांना करून देण्यात आली.

याचबरोबर ग्रामस्थांनीही कुटुंबस्तरावरच प्लास्टिक प्रदूषणाला रोखावे, यासाठी प्रभातफेरीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. यावरील उपायदेखील सांगण्यात आले. हा प्रकल्प परिसरातील २० शाळांमध्ये राबवला जात आहे. त्यात शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांमध्येही जागृती केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:45 PM 04/Dec/2024