पावस : कोकण गिड ही स्थानिक गायीची जात नष्ट होऊ नये म्हणून आता देशी गायीला सरकारने राजमाता घोषित केले आहे. मात्र सरकारने घोषणा करण्यापूर्वीच गायीचे संवर्धन व्हावे यासाठी रत्नागिरी तालुक्यातील ठिकाण बेहेरे येथे गोशाळा सुरू करण्यात आली आहे. गेली तीन वर्षे हा उपक्रम सुरू ठेवण्यात आला असून, यापुढेही तो चालू ठेवणार असल्याचे ठिकाण बेहरे येथील मिलिंद बेहेरे यांनी सांगितले.
या परिसरामध्ये अनेक शेतकरी शेतीच्या कामासाठी जनावरांचा उपयोग करतात; मात्र शेतीच्या कामानंतर त्यांना मोकाट सोडले जाते. त्यामुळे भविष्यात या जनावरांचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली. या गुरांचे संवर्धन करण्याच्यादृष्टीने २०२२ पासून गोशाळा उपक्रमाला बेहेरे यांनी सुरवात केली. यामध्ये विशेषकरून गायींना सांभाळले जाते. मेर्वी, कुर्चे, गावखडी, मावळंगे, नाखरे आदी गावांमधून लोकांना नको असलेल्या गायी येथे आणून दिल्या जातात. त्यांचे योग्य ते संगोपन करण्यासाठी ११० फूट लांबीचा ३० फूट रुंद गोठा बांधण्यात आला, त्यांना राहण्यासाठी तीन गव्हाणे बांधण्यात आल्या. सध्या या ठिकाणी ६३ गायी आणि वासरे आहेत. त्यांच्या वर्षभराच्या चाऱ्यासाठी ८० बाय ४० क्षेत्रफळाचा वीस फूट उंचीचा मंडप घालण्यात आला आहे. पुढील वर्षी काही समस्या निर्माण झाल्यास किंवा गवताचा तुटवडा झाल्यास संबंधित जनावरांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी गायींसाठी लागणारा पेंडा व गवत जवळपासच्या गावातील शेतकऱ्यांकडून विकत घेतले जाते.
बेहेरे म्हणाले, जुलै ते नोव्हेंबर या दरम्यान हापूस आंब्याच्या बागांमध्ये या गायींना चरण्यासाठी सोडले जाते. त्यामुळे बागा साफ होतात. त्यामुळे गवत काढण्याचा ८० ते ८५ टक्के खर्च वाचतो. त्याचबरोबर गायीचे शेण, गोमुत्र त्या बागायतीमध्ये खत म्हणून वापरले जाते. त्यामुळे रासायनिक खत वापरण्याचा प्रश्न उद्भवत नाही. गायी, वासरे बागेच्या क्षेत्रामध्ये फिरण्यासाठी सोडली जातात. सायंकाळी ही सर्व जनावरे दाव्यावर येतात.
भविष्यात गायीची जात नष्ट होऊ नये, म्हणून प्रत्येकाने आपल्या गोठ्यामध्ये दोन गायी बाळगणे काळाची गरज आहे. तरच पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्यादृष्टीने सोयीस्कर ठरेल; अन्यथा भविष्यात गायीची जात संवर्धन करण्यासाठी चळवळ उभारण्याची वेळ येऊ शकते. – मिलिंद बेहेरे, कुर्धे
बंदिस्त गोठा
गायी-वासरांना विवटा किंवा अन्य वन्यप्राण्यांपासून कोणताही त्रास होऊ नये, यासाठी गोठा बंदिस्त करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचे आपोआप संरक्षण होते. उर्वरित सहा महिने शेण, गोमुत्राचा बागायतीसाठी खताच्यादृष्टीने वापर केला जातो. त्यांच्या देखभालीसाठी चाऱ्याच्या माध्यमातून अडीच हजार रुपये वगळता कामगारांचा दिवसाला ४०० ते ५०० रुपये खर्च येतो. या सर्व गोष्टींचे योग्य तऱ्हेन नियोजन होत असल्यामुळेच या गोशाळेचा उद्देश खऱ्या अर्थाने सफल होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:09 PM 04/Dec/2024














