सावर्डे : येथील डेरवण फाटा ते वालावलकर रुग्णालय या स्त्यावर रुग्णालयानजीकच्या ओढ्यात रहिवाशांकडून मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जात आहे. त्यामुळे ओढ्याचे पाणी दूषित होत आहे. दूषित पाण्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
येथील वालावलकर रुग्णालय, रुग्णालयाशी संबंधित शिकवले जाणारे विविध व्यावसायिक अभ्यासक्रम, वैद्यकीय महाविद्यालय, इंग्रजी माध्यम शाळा आदी कारणांनी हा परिसर दिवसेंदिवस विकसित होत आहे.
परिसरात प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, कर्मचारी, नोकरवर्गाची संख्याही वाढत आहे. रुग्णालयामध्ये काम करणारे कर्मचारी, विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी हे भाडेतत्त्वावर येथील निवासी संकुलामध्ये राहत आहेत. सावर्डे ग्रामपंचायतीची कचरा गोळा करणारी गाडी दररोज या मार्गावर फिरून कचरा गोळा करते. तरीही नागरिक रुग्णालयाकडे जाता-येता ओढ्यात ओला कचरा, खराब अन्नपदार्थ फेकतात. सध्या ओढ्यातून पाणी वाहत आहे. हा कचरा पाण्यात मिसळून पाणी खराब होत आहे. ओढ्याच्या काठावर परिसरातील निवासी संकुलांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत. या विहिरीत हे दूषित पाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या ओढ्यात प्लास्टिक पिशव्यांचाही थर साचला आहे. हे असेच चालू राहिल्यास पावसाळ्यापर्यंत हा कचरा मोठ्या प्रमाणात साचतो. त्यानंतर पावसाळ्यात ओढ्याच्या मोठ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर हा कचरा वाहून जातो. हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने योग्य मार्ग काढण्याची मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:21 PM 04/Dec/2024














