रत्नागिरी जिल्ह्याला परतीच्या पावसाचा दणका

रत्नागिरी : परतीच्या पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला जोरदार दणका दिला. बुधवारी रात्री तसेच गुरुवारी सकाळीही मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले. यामुळे जिल्ह्यात खरीप लागवड क्षेत्रालाही दणका बसण्याची शक्यता असून, अनेक भागांत उभ्या पिकांच्या लोंबी आडव्या झाल्या आहेत.

दरम्यान, गुरुवारी संपलेल्या 24 तासांत जिल्ह्यात 46 मि.मी.च्या सरासरीने 421 मि.मी. एकूण पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात पावसाचा जोर होता.

कोकण किनारपट्टी भागात गेले चार दिवस पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात ठिय्या मांडला. बुधवारी रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला होता. तो मंगळवारी सकाळपासून कायम होता. अनेक भागांत जोरदार पावसाने जनजीवनावर परिणाम झाला असून, या पावसाने शेतीलाही तडाखा दिला आहे. भात लागवड क्षेत्रात बांधांना धक्का पोहोचला असून, दगड मातीचा भराव भात पिकामध्ये साचला आहे. काही भागांत भातपीक आडवे झाले आहे. पाण्याचा निचरा झाल्यानंतरच पीकस्थितीचा आढावा घेणे शक्य होणार असल्याने शेतकर्‍यांमध्ये पाऊस ओसरण्याची प्रतीक्षा सुरू आहे.

उत्तर कोकणापासून अरबी सागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्याने परतीच्या पावसाचा जोर वाडण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत पावसाचा जोर कामय राहणा असून रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिजोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे तर पालघर जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. दरम्यान, गुरूवारी रत्नागिरी जिल्ह्यात 421 मि. मी. पाऊस झाला. यामध्ये मंडणगड तालुक्यात 98 मि. मी., दापोली 48.50, खेड 75.90, गुहागर 35.30, चिपळूण 42.10, संगमेश्वर 35.20, रत्नागिरी 24.50, लांजा 42.40 आणि राजापूर तालुक्यात 20.10 मि.मी. पावसाची नोंद झाली. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात पावसाने चार हजाराची सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 122 टक्के पाऊस झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 27-09-2024