रत्नागिरी : दिव्यांगांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी सर्व विभागांनी हातात हात घेऊन व खांद्याला खांदा लावून काम करण्याची गरज आहे, असे मनोगत मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.
समाज कल्याण विभाग, जि.प. आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने काल जिल्हा परिषदेच्या लोकनेते शामराव पेजे सांस्कृतिक भवनात आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन २०२४ साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जयेंद्र जाधव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागाचे अॅड अजित वायकुळ, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संचालक सुरेखा पाथरे, समाज कल्याण दिव्यांग सहाय्यता कक्षाचे प्रमुख दीपक आंबवले आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुरुवात अमेय पंडित यांच्या प्रार्थना गायनाने झाले.
मनोगत व्यक्त करताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार म्हणाले, दिव्यांगांच्या सर्व सर्वांगीण पुनर्वसनासाठी सर्व विभागांनी हातात हात घेऊन व खांद्याला खांदा लावून काम करण्याची गरज आहे. यासाठी जिल्हा परिषद आपल्या पाठीशी सदैव राहील. आपल्या दिव्यांगत्वावर मात करून कार्य करणाऱ्या अक्षय परांजपे, धीरज साठविलकर, प्रवीण केळकर, अमेय पंडित या दिव्यांगांचे श्री. पुजार यांनी कौतुक केले.
या कार्यक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी कार्यालयाचे अॅड वायकुळ यांनी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ या कायद्यातील तरतुदींची माहिती दिली. या कार्यक्रमात आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी च्या वतीने देण्यात येणारा ‘दिव्यांग प्रेरणा पुरस्कार’ या वर्षी अक्षय संतोष परांजपे यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जाधव यांनी देखील दिव्यांगांशी संवाद साधला. प्राथमिक स्वरूपात २१ दिव्यांग प्रवर्गातील दिव्यांगांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संचालक श्रीमती पाथरे यांनी केले. आभार प्रदर्शन समाज कल्याण दिव्यांग सहाय्यता कक्षाचे प्रमुख दीपक आंबवले यांनी केले. या प्रसंगी मोठ्या संख्येने दिव्यांग व त्यांचे पालक उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:56 PM 04/Dec/2024