सचिन तेंडुलकर ला पाहून विनोद कांबळी भावूक

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळी काही दिवसांपूर्वी त्याच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे चर्चेत आला होता. विनोद कांबळीचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

व्हिडीओमधील त्याची अवस्था पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली होती. व्हिडीओत विनोद कांबळीची प्रकृती इतकी बिघडल्याचे दिसत होती की त्याला त्याच्या दोन पायांवरही उभं राहता येत नव्हतं. हा व्हिडिओ पाहून क्रिकेट चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. अनेकांनी यासंदर्भात सचिन तेंडुलकर याने विनोद कांबळीची मदत करायला हवी असेही म्हटले होते. त्यानंतर आज मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची भेट झाली. त्याचा व्हिडीओदेखील चांगलाच व्हायरल होत आहे.

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे दोघे बालपणीचे मित्र. हे दोघे मुंबईत एकत्र क्रिकेट खेळायचे. रमाकांत आचरेकर यांच्या शारदाश्रम शाळेत ते एकत्र होते. एका कार्यक्रमात एकत्र आले होते. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे दोघं जण मुंबईतील एका कार्यक्रमात एकत्र आले होते. या दोघांचे गुरुवर्य रमांकात आचरेकर यांच्या स्मारकाचे आज अनावरण झाले. या कार्यक्रमाला सचिन आणि विनोद दोघे एकत्र उपस्थित होते. यावेळी विनोद कांबळीला स्टेजवर बसलेला पाहताच सचिन तेंडुलकर पुढे आला. त्याने आपल्या जुन्या मित्राचा हात हातामध्ये घेतला. त्याची आपुलकीने विचारपूस केली. सचिनला पाहताच विनोद कांबळी देखील चांगलाच भावुक झाला होता. या दोघांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून क्रिकेट फॅन्सही इमोशनल झाले.

दरम्यान, टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू अशी विनोद कांबळीची ऐकेकाळची ओळख होती. पण, तो खराब फॉर्म आणि बेशिस्त वर्तणुकीमुळे टीम इंडियातून बाहेर फेकला गेला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विनोद जवळचा मित्र होता. दोघांनीही एकाच काळात मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये क्रिकेटचा श्रीगणेशा केला. पण क्रिकेटपासून दूर राहिलेल्या विनोद कांबळीला मधल्या काळात आर्थिक तंगीचा सामना करावा लागला. त्यावेळी त्याने बालमित्र सचिनवर टीका केली होती. त्यामुळे दोघांमध्ये मनभेद असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. पण आज सचिन-विनोदची भेट पाहून सारेच भावूक झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:07 04-12-2024