रत्नागिरी : कंत्राटी ग्रामसेवक भरतीत १७२ उमेदवारांची निवड

रत्नागिरी : कंत्राटी ग्रामसेवक भरतीत १७२ उमेदवारांची निवड करण्यात आली असून, १३१ उमेदवारांना नियुक्तिपत्रे दिली आहेत. उर्वरित निवड झालेल्या ४१ कंत्राटी ग्रामसेवकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून नियुक्तिपत्रे देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि माजी सैनिकांचा समावेश आहे.

जिल्ह्यात ग्रामसेवकांची २९० पदे रिक्त असल्याने ग्रामपंचायतींमधील कामांचा खोळंबा होत आहे. त्यामुळे ग्रामसेवकांची भरती करण्याची मागणी सातत्याने सुरू होती. २०१५ नंतर कंत्राटी ग्रामसेवकांची भरती झालेली नाही. २०१९ मध्ये शासनाने कंत्राटी ग्रामसेवक भरती करणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार १८५ पदांसाठी जाहिरात काढण्यात आली होती; मात्र या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. शासनाच्या प्रयत्नानंतर सुमारे ४ वर्षांच्या कालावधीनंतर या प्रक्रियेला वेग येऊन १७२ उमेदवारांची कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांपैकी ४१ उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. या पडताळणीनंतर नियुक्तिपत्रे देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात ग्रामसेवकांची २९० पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम ग्रामपंचायतीच्या कामकाजावर होत आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने एका ग्रामसेवकाकडे दोन दोन ग्रामपंचायतींचा पदभार सोपवला आहे.

ग्रामसेवकांनाही हा पदभार सांभाळताना कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यात ग्रामसेवकांच्या रिक्त पदांपैकी ५० टक्के पदे म्हणजेच १८५ पदे भरती करण्यात येणार असल्याने त्यासाठी ४१ हजार सुशिक्षित बेरोजगारांनी अर्ज सादर केले होते. त्यामधून ३३६ उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी केली होती. त्यामधून १७२ उमेदवारांची कंत्राटी ग्रामसेवकपदासाठी निवड केली.

१३ पदे रिक्त
जिल्ह्यातील १८५ कंत्राटी ग्रामसेवक भरतीमध्ये १७२ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. उर्वरित १३ पदे रिक्त राहिली आहेत. ही पदे माजी सैनिकांसाठी आरक्षित ठेवण्यात आली होती; मात्र माजी सैनिक मिळाले नसल्याने ही पदे रिक्त राहणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 05/Dec/2024