अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणारा संशयित पोलिसांच्या ताब्यात

देवरुख : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला पळवून नेल्याची तक्रार देवरूख पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांनी दाखल केली होती. या प्रकरणी तपास करत देवरूख पोलिसांनी तरुणाला आंबा या ठिकाणाहून ताब्यात घेतले. बुधवार 4 डिसेंबर रोजी त्याला देवरुख न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशानी ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश आनंदा जाधव (२४, केर्ले, ता. शाहूवाडी. जि. कोल्हापूर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. देवरुख नजिकच्या एका गावातील अल्पवयीन मुलीची व गणेश जाधव या तरुणाची देवरुख बसस्थानक येथे भेट झाली होती. यानंतर ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. आपली मुलगी सायंकाळपर्यंत घरी न आल्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून अज्ञात इसमाने पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी देवरुख पोलीस ठाण्यात दिली.

या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात भारतीय न्याय संहिता १३७ (२), ८७ कलमान्वये दाखल केला. पोलिसांनी माहिती घेतली असता त्याचे नाव गणेश जाधव असल्याचे समजले. पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. अखेर तो आंबा येथे असल्याची गोपनीय माहिती मिळताच देवरुख पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव, हे. कॉ. प्रशांत मसुरकर, हे. कॉ. सागर मुरुडकर, हे. कॉ. सचिन पवार, पो. हवालदार अभिषेक वेलवणकर यांना मंगळवारी सकाळी १० वा. आंबा गाठले. यावेळी गणेश हा या मुलीसोबत एका पडक्या घरात असल्याचे दिसून आले. यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन देवरुख येथे आणले.

मुलीला घरच्यांच्या ताब्यात दिले तर गणेश जाधव याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता ९ रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 05-12-2024