चिपळूणात वनराई बंधाऱ्यांचे शतक पूर्ण

चिपळूण : ग्रामीण भागात परे, नाले व ओढ्यातून वाया जाणारे पाणी बंधाऱ्याच्या माध्यमातून अडवण्यात येत आहे. यावर्षी तालुक्यात एकाच दिवशी व्यापक प्रमाणात वनराई बंधारे उभारण्याची मोहीम राबवली जाणार आहे. त्यानुसार १० डिसेंबरला प्रत्येक ग्रामपंचायतीत बचतगटाच्या महिला, विद्यार्थी, ग्रामस्तरावरील शासकीय कर्मचारी तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या लोकसहभागातून किमान १० बंधारे उभारण्यात येणार आहेत. या मोहिमेवर देखरेख ठेवण्यासाठी चिपळूणच्या गटविकास अधिकाऱ्यांनी गणनिहाय अधिकान्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. तालुक्यात एकूण १३०० बंधारे उभारण्यात येणार असून, सध्या १०० बंधारे पूर्ण झाले आहेत.

मिशन बंधारे मोहिमेबाबत गटविकास अधिकारी उमा घार्गे-पाटील म्हणाल्या, पावसाळी हंगाम संपुष्टात आल्याने संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी दरवर्षी पावसाळ्यानंतर पंचायत समितीच्या माध्यमातून मिशन बंधारे मोहीम हाती घेण्यात येते. बंधाऱ्यात पाणी अडवून व जिरवून पाण्याचा शेत्ती व गुरांना पिण्याकरिता तसेच बोअरवेल, विहिरीची पाण्याची पातळी वाढवण्याकरिता नदीनाले, ओहोळ, पऱ्यावर छोटे-मोठे कच्चे, वनराई व विजय चंधारे बांधण्यात येतील. नदीच्या पाण्याला अडवून ते भूगर्भात पाण्याची पातळी वाढून संभाव्य पाणीटंचाई टाळता येईल.

यावर्षी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी झाल्याने बंधाऱ्यांची मोहीम रखडली होती. परे, नाले, ओढे, नदीतील वाया जाणारे पाणी बंधाऱ्याच्या माध्यमातून अडवल्यास शेतीसह, गुरांना तसेच ग्रामस्थांना वैयक्तिक वापरासाठी ते फायदेशीर ठरते. त्याशिवाय उन्हाळ्याची दाहकता कमी होण्यासही मदत होते.

त्यासाठी यावर्षी व्यापक प्रमाणात १० डिसेंबरला एकाच दिवशी मिशन बंधारे मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्रत्येक दोन-तीन गावांसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. गावातील बचतगटाच्या महिला, शालेय विद्यार्थी, तरुण मंडळे, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, गावस्तरावरील सर्व शासकीय अधिकारों व कर्मचारी यांच्या सहयोगातून बंधारे घातले जाणार आहेत. सामाजिक सेवाभावी संस्था पदाधिकाऱ्यांची मदत घेऊन कच्चे बंधारे, विजय बंधारा, वनराई बंधारे उभारण्याच्या सूचना केल्या आहेत.

बंधाऱ्यांची मोहीम यशस्वी होण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायत स्तरावर ग्रामस्थांच्या बैठका सुरू आहेत. ग्रामस्थांनी पुढाकार घेण्याचे या माध्यमातून केले जात आहे. लोकसहभागातून मिशन बंधारे मोहीम यशस्वी करावी, बंधाऱ्याच्या माध्यमातून वाडीवस्तीवर चांगला पाणीसाठा करावा या कामी गावस्तरावर सर्वांनी योगदान द्यावे. उमा घार्गे-पाटील, गटविकास अधिकारी, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 05/Dec/2024