रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यामधील भोगवे समुद्रात भारतातील सर्वात पहिली खोल समुद्रातील बोट फिशिंग स्पर्धा उत्साहात पार पडली. ‘कोंकण एक्स्ट्रीम अँग्लर्स ‘मार्फत भरविण्यात आलेल्या या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रत्नागिरीच्या रेड मरीन संघांने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
कोकणातील किनारपट्टीवर गेली ५ वर्षे ही स्पर्धा भरवली जाते. यंदा सहाव्या वर्षी पहिल्यांदाच ही स्पर्धा खोल समुद्रात रॉडच्या सहाय्याने मासे पकडण्याची होती. एका बोटीवर ५ स्पर्धक, एक बोट तांडेल (कॅप्टन) आणि आयोजनाकडून एक मार्शल अशी ७ जणांची टीम नेमण्यात आली होती. स्पर्धेत संपूर्ण भारतातून १२ वेगवेगळे संघ सहभागी झाले होते. मुंबई, पुणे, रत्नागिरी, पनवेल, मंगळूर, बेंगलोर, गोवा अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून हे स्पर्धक आले होते. स्पर्धकांच्या सेफ्टीबाबत काळजी घेऊनच ही स्पर्धा भरवली गेली. ज्यामध्ये जॅकेटस, बोया रिंग, मेडिकल सर्व्हिस, बॅकअप बोट, एक्स्ट्रा इंजिन, प्रत्येक बोटीवर पाणी बॉटल, नाश्ता, कचरा टाकण्यासाठी बिन बॅग या सर्व सोयी आयोजकांकडून पुरवल्या गेल्या.
स्पर्धेचे बक्षीस वितरण आर्यवर्त कृषी पर्यटन भोगवे येथे करण्यात आले. कर्नाटक राज्यातून आलेल्या टीम मलबारीझ या संघाने तब्बल १२.५०० किलोचा गोबरा प्रजातीचा मासा पकडून प्रथम तर रत्नागिरीच्या रेड मरीन संघाने द्वितीय, गोव्याच्या लुअर लीजंट या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे यशस्वी आयोजन पराग वाडकर, ओंकार शिवलकर, वैभव कदम, अभिषेक आळेकर, पियुष वाकडे, विनायक बोडणेकर, दत्ता पदुमले, राजा रोगे, महाराजा बोट सर्व्हिस, ऋषी सामंत, रोहित सामंत, राजन मालंडकर, मंगल सामंत आर्यावर्त कृषी पर्यटन यांनी केले.
प्रथम संघाला मिळाले ७५ हजाराचे पारितोषिक
प्रथम संघाला ७५००० रुपये, kxa ट्रॉफी, मेडल आणि टॅकलस आणि संपूर्ण संघाला अंदमान फिशिंग ट्रिप व बोटच्या कॅप्टन म्हणजेच तांडलाला १० हजार रुपये, द्वितीय संघाला ५० हजार रुपये, ट्रॉफी मेडल आणि टॅकल तर तृतीय संघाला ३५ हजार रुपये, ट्रॉफी मेडल आणि टॅकल. फर्स्ट कॅच – विनायक महाडीक (मुंबई), मॅक्स कॅच कौशल केळसकर व अनिकेत निरोखेकर (रत्नागिरी). अँग्लर ऑफ द ईअर डॉ. कस्तुरे (रत्नागिरी), लेडी अँगलर – दीक्षित (बेंगलोर) वैयक्तिक बक्षिसे ट्रॉफी, मेडल आणि टॅकल्स देण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 05/Dec/2024














