रत्नागिरी : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३५ हजार ८०१ बागायतदारांनी आंबा व काजू क्षेत्रावरील विमा उतरवला आहे; मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा १ हजार बागायतदारांनी विमा योजनेकडे पाठ फिरवली आहे.
शासनाने दहा गुंठे क्षेत्र असेल त्यांनाच विमा योजनेत सहभागी करून घेण्याच्या अटीमुळे बागायतदारांच्या संख्येत घट झाली आहे.
बदलत्या हवामानाच्या धोक्यामुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर विपरित परिणाम होऊन उत्पादनात घट होते. परिणामी, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते. त्यासाठी पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना केंद्र व राज्य शासनाने लागू केली आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यात अर्थार्जन मिळवून देणाऱ्या आंबा व काजू या पिकांचा फळपीक विमा योजनेत समावेश करण्यात आला आहे. अवकाळी पाऊस, कमी-जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट यापासून संरक्षणासाठी फळपीक विमा योजना निर्धारित काळासाठी राबवण्यात येत आहे. १ डिसेंबर ते ३१ मार्च आणि १ एप्रिल ते १५ मे हा कालावधी अवकाळी पावसासाठी निश्चित केला आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यास परतावा दिला जातो. गतवर्षी ७० कोटी रुपये परतावा बागायतदारांना वितरित केला होता. यंदा या योजनेत सहभागी होण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. त्याचा लाभ जिल्ह्यातील बागायतदारांनी घेतला आहे. यावर्षी जिल्ह्यातील ३५ हजार ८०१ बागायतदारांनी विमा उतरवला आहे. गतवर्षी ३६ हजार ८१८ बागायतदारांनी विमा उतरवलेला होता. सुमारे १ हजार बागायतदारांनी यंदा या योजनेकडे पाठ फिरवली आहे. शासनाने कोकणासाठी विमा निकषात बदल केले आहेत. १० गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्रावरील आंबा, काजू लागवडीवर विमा उतरवता येणार नाही, अशी अट ठेवली आहे. कोकणात जुन्या काळात कमी जागेत लागवड केली जाते. एका गुंठ्याला एक कलम असे धरले तर दहा गुंठ्याला दहा झाडे असतात. त्या क्षेत्रावरील झाडांचा विमा उतरवला गेला नाही तर संबंधित बागायतदारांचे नुकसानच आहे. त्यामुळे कमी क्षेत्र असलेल्या बागायतदारांना या योजनेचा लाभ दिला गेलेला नाही. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
शासनाने विमा क्षेत्रासाठी चार एकरची मर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे मोठे क्षेत्र असलेल्या बागायतदारांची अडचण होते. हवामानातील बदल हा फक्त विमा उतरवलेल्या क्षेत्रावर होतो असे नाही. त्यामुळे उर्वरित क्षेत्राबाबत विम्याचा विचार होत नाही. अधिक क्षेत्र असलेल्या बागायतदारांना त्याचा फायदा नाही. त्यामुळे या योजनेला कमी प्रतिसाद मिळतो. काही बागायतदारांनी विमा उतरवण्यास नकारही दिला आहे. – राजन कदम, आंबा बागायतदार
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:11 05-12-2024