खेड : खेड जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर्स असोसिएशन (केजीपीए) ने गुलमोहर पार्क येथील गोळीबार मैदान आणि क्रीडा संकुल येथे स्पोर्ट्स डे आयोजित केला. या कार्यक्रमात डॉक्टर्स आणि त्यांच्या कुटुंबियांनी विविध खेळांमध्ये सहभाग घेतला.
या स्पोर्ट्स डेमध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, कॅरम, बुद्धिबळ, बॅडमिंटन असे विविध खेळ खेळण्यात आले. या कार्यक्रमात डॉक्टर्सनी उत्साहाने भाग घेतला आणि खेळाच्या माध्यमातून एकमेकांशी नातेसंबंध प्रस्थापित केले.
केजीपीए दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि कला या क्षेत्रात विविध कार्यक्रम आयोजित करून समाजात एक सकारात्मक योगदान देत असते. एड्स दिन असल्याने, उप जिल्हा रुग्णालय कळंबणीचे विलास म्हस्के, सूर्यवंशी आणि घाडगे यांनी उपस्थित डॉक्टर्सना एड्स विषयी जागरूक केले. त्यांनी या उपक्रमात एड्स रुग्णांची काळजी घेण्याची शपथ सर्व डॉक्टर्सना घडवून दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. परेश मळनदगावकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. केजीपीएचे अध्यक्ष डॉ. श्याम गिल्डा यांनी खेळांचे महत्त्व विशद करताना सांगितले की, मैदानी खेळ शारीरिक आरोग्य चांगले ठेवतात तर बैठ्या खेळ मनाचे आरोग्य आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढवतात.
त्यांनी सर्व डॉक्टर्सना हार-जीत न विचारात घेता खेळाच्या भावनेने सहभागी होण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात सचिव डॉ. आदेश भोसले, खजिनदार सिद्धेश चिखले, कार्यक्रम सह-प्रमुख डॉ. प्रवीण राठोड, अध्यक्ष डॉ. अजित भोसले, डॉ. दीपक मोरे, महिला डॉक्टर्स आणि अन्य डॉक्टर्स उपस्थित होते. सूरज पाटणे, राजू शिर्के, विजय मोरे यांनी पंच म्हणून यावेळी काम पाहिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:12 PM 05/Dec/2024














