मोबाईल हाताळताना खबरदारी घेणे आवश्यक : प्रा. श्रीराम दांडेकर

चिपळूण : आजचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात झालेली क्रांती अद्भूत आहे. मोबाईलमुळे ही क्रांती गावागावापर्यंत पोहोचली व मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून ते सुखकर केले आहे. मात्र या मोबाईलचा वापर म्हणजे दुधारी तलवार आहे. मोबाईल शिक्षणासाठी, संपर्क साधण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी अशा विविध चांगल्या कार्यासाठी वापरला जात असला तरी या मोबाईलच्या अतिरिक्त व बेफिकीर वापराने अनेक समस्यांनाही तोंड द्यावे लागते. त्यामुळे मोबाईल हाताळताना अत्यंत खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे मत प्रा. श्रीराम दांडेकर यांनी व्यक्त केले.

डी. बी. जे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने मौजे चिंचघरी होते. (गणेशवाडी) येथे आयोजित ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबिरात मोबाईल हाताळताना या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्याख्यानाची सुरुवात करताना प्रा. दांडेकर यांनी मोबाईलचा वापर कोणकोणत्या सकारात्मक बाबींसाठी करता येतो याचा आढावा घेतला. उपकरणे हॅक होऊ नयेत म्हणून व हॅक झाली तर काय करावे याबाबतही त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन लाघवी सावले हिने, वक्त्यांचा परिचय राधा चितळे यांनी तर ऋतांश कदम यांनी आभार मानले. उपप्रचार्य डॉ. राजेंद्र मोरे, एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. अरूण जाधव, प्रा. विठ्ठल कोकणी, प्रा. विनायक बांद्रे, प्रा. साडविलकर, प्रा. रूपाली पाटील उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 06/Dec/2024