चिपळूण : मोबाईलच्या आभासी विश्वात आजकालची तरुण पिढी वाचन विसरली आहे. आई-वडिलांनाही वेळ नाही. त्यामुळे ग्रंथालयात पुस्तकांना वाचक नाहीत. अशा कठीण स्थितीत ग्रंथालय मित्र संस्था समाज जागृतीसाठी कार्य करीत आहे, हे कौतुकास्पद आहे. रत्नागिरी जिल्हा बँक आणि अशा अनेक संस्था याकामी नक्कीच सहकार्य करतील, असे प्रतिपादन डॉ. तानाजीराव चोरगे यांनी केले.
चिपळूण येथे ‘ग्रंथालय मित्र मंडळ’ मेळावा आयोजित करण्यात आला होता. उद्घाटनप्रसंगी बोलताना लेखक व रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी, बदलत्या परिस्थितीत पुस्तकांचा संग्रह आणि त्यांची देवघेव करण्याचे ठिकाण एवढेच कार्य ग्रंथालयांना पुरेसे ठरणार नाही. त्यांना सांस्कृतिक केंद्राचे नवे, विस्तारित रूप घ्यावे लागेल. तेथे केवळ वाङ्मय नव्हे, तर विविध विद्याशाखांचा पाठपुरावा करावा लागेल. वेगवेगळी माध्यमे वापरावी लागतील. ज्ञान संकलन व ज्ञान प्रसारण हे त्यांचे मुख्य कार्य राहील, असा अभिप्राय व्यक्त केला.
दातार, बेहेरे, जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य माधव बापट यांनी अध्यक्षीय समारोप केला. ‘ग्रंथालय मित्र मंडळा’चे प्रवर्तक सुधीर बडे आणि ‘व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन’चे संचालक गिरीश घाटे यांनी दिवसभराच्या चर्चासत्राचे प्रास्ताविक मांडले. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर’चे कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी सर्व प्रतिनिधींचे स्वागत केले.
यावेळी गजानन जोशी, मनोज गोगटे यांनी मनोगत व्यक्त केले. प्राची जोशी, विनिता नातू, अरुण इंगवले, समीर कोवळे, धनंजय चितळे, किशोर नारकर, राष्ट्रपाल सावंत, सुहास बारटक्के, कैसर देसाई, श्री. कदम इत्यादींनी चर्चेत सहभाग घेतला. श्री. बड़े यांनी गावोगावी ‘ग्रंथालय मित्र मंडळे’ कशी बनवता येतील याबाबत माहिती दिली. चर्चेत डॉ. रत्नाकर थत्ते यांनी व्यक्तिशः करीत असलेल्या ग्रंथप्रसार प्रयत्नांची माहिती दिली. प्रकाश देशपांडे यांनी चर्चासत्र उपयुक्त ठरले असल्याचा हवाला देत दिवसभराच्या कार्यक्रमाचा समारोप केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:02 PM 06/Dec/2024














