पिंपळाच्या पानावर साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कलाकृती

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वसईतील भाताणे गावातील चित्रकार कौशिक दिलीप जाधव यांनी एक अद्वितीय कलाकृती साकारली आहे.

त्यांनी पिंपळाच्या पानावर डॉ. बाबासाहेबांचे चित्र साकारून त्यांना अभूतपूर्व श्रद्धांजली अर्पण केली आहे. पिंपळाच्या झाडाला बौद्ध धर्मात विशेष महत्त्व आहे, कारण गौतम बुद्धांना याच झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले होते.

पिंपळाचे पान कधीच नष्ट होत नाही, त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांचे विचारही अनंत काळ टिकून राहतील, असा संदेश या कलाकृतीतून दिला गेला आहे.

ही कलाकृती कौशिक जाधव यांनी केवळ एका तासात पूर्ण केली. वॉटर कलरचा वापर करून त्यांनी पिंपळाच्या पानावर बारकाईने बाबासाहेबांचे चित्र रेखाटले आहे.

बाबासाहेब आंबेडकर हे जसे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणारे विचारसूर्य आहेत, तसेच पिंपळाच्या झाडासारखे अखंड प्रेरणा देणारेही आहेत, असे जाधव सांगतात.

कौशिक जाधव हे वसईतील न्यू इंग्लिश स्कूल, आर. व्ही. नेरकर शाळेत कलाशिक्षक म्हणून कार्यरत असून, आपल्या कलाकृतीतून समाजाला प्रेरणा देण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:33 06-12-2024