◼️ राज्यात ‘रत्नागिरी पॅटर्न’ राबवणार : पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेचे काम राज्यात सर्वोत्तम आहे. जि.प.ने राबवलेल्या ‘नासा’ व ‘इस्रो’ तसेच सौर प्रकल्प या दोन उपक्रमांची दखल शासनाला घ्यावी लागली आहे. हा आता ‘रत्नागिरी पॅटर्न राज्यात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेमार्फत प्रतिवर्षीप्रमाणे जिल्ह्यातील आदर्श शाळा पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार व मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्काराचे वितरण पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते गुरुवारी मराठा भवन येथे झाले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, किरण लोहार, प्राथमिक शिक्षाधिकारी बी, एम. कासार आदी उपस्थित होते.
पालकांपेक्षा मुले शिक्षकांच्या सान्निध्यात असतात. शिक्षकांचा ते आदर करतात. शिक्षक म्हणून हा आदर कायम ठेवा. भविष्यातील आदर्श पिढी तयार करण्यासाठी शिक्षकांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत. केवळ पुरस्कारासाठी शाळा सुंदर न करता जिल्ह्यातील सर्वच शाळा सुंदर कराव्यात, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
नासा, इस्रोसारख्या ठिकाणी शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच ग्रामीण भागातील आपले विद्यार्थी तेथे भेट देऊन आले. हे विद्यार्थी परिस्थितीने जरी गरीब असले तरी, बुद्धीने श्रीमंत आहेत, असे प्रशंसोद्गार नासातल्या वैज्ञानिकांनी काढले. आपल्या देशाची, रत्नागिरी जिल्ह्याची शान वाढविणारे हे प्रशस्तिपत्रक आहे. याचे श्रेय शिक्षकांना जाते, असे पालकमंत्री म्हणाले माझ्यासारखाच आदर्श शिक्षक मी तयार करेन, अशी शपथ आजच्या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने घेतली पाहिजे, किमान १० आदर्श विद्यार्थी तयार करेन, अशीदेखील शपथ शिक्षकांनी घेतली पाहिजे. त्यादृष्टीने त्यांनी मार्गक्रमण करावे, आवाहनही यावेळी पालकमंत्र्यांनी केले.
शैक्षणिक जीवनात प्राथमिक शिक्षक हा केंद्रबिंदू ठरतो. बालपणी त्यांनी केलेले संस्कार भविष्यातही उपयोगी पडतात, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, पालकापेक्षा शिक्षकांनी सांगितलेले बरोबर आहे, अशी विद्यार्थ्यांची भावना असते. शिक्षकांनीदेखील अभ्यासूवृत्तीने विविध क्षेत्रांतील ज्ञान दिले पाहिजे. वयस्कर शिक्षकांना अशैक्षणिक कामापासून सूट द्यायला हवी. १०० टक्के निकालाची अपेक्षा करताना शिक्षकांचे प्रश्न सहानुभूतीपूर्वक सोडवून, प्रशासनदेखील आदर्श वाटले पाहिजे, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
भविष्यातील आदर्श पिढी निर्माण करतानाच सर्व शाळादेखील सुंदर बनवाव्यात. हा पुरस्कार आदर्श शिक्षकापेक्षा मोठा असेल, असे पालकमंत्री सामंत म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार म्हणाले की, ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारून पारदर्शीपणे वा अर्जाची छाननी केली आहे. आपल्या जिल्ह्याची गुणवत्ता ही टॉप वनमध्ये आहे. जिल्ह्यातील समृद्ध परंपरा जतन करून ठेवण्याची आपली जबाबदारी आहे. त्यादृष्टीने शिक्षक काम करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी मेहनत घ्यायला हवी. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकी, विद्यार्थी, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…तर त्यांच्यावर कठोर कारवाई करा
काही शिक्षक शिक्षकी पेशाला बदनाम करत असतील, जाती-पातीचे राजकरण करत असतील तर, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्याचबरोबर ज्या शिक्षकांना राजकारणाची हौस असेल त्यांनी व्हीआरएस घेऊन खुशाल राजकारण करावे. शिक्षक संघटनांनीही अशा प्रवृत्तीला चाप लावला पाहिजे, त्यांच्यावर बंधने घातली गेली पाहिजेत, असेही मंत्री सामंत यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 27/Sep/2024