राजापूर : फेंजल चक्रीवादळाने वातावरणात बदल झाले आहेत. मागील आठवड्यात राजापुरात अधिक थंडी होती; मात्र मागील दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, थंडी गायब झाली आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला असे वातावरण असल्यामुळे त्याचा आंबा-काजू हंगामावर परिणाम होण्याची भीती तालुक्यातील बागायतदारांना सतावत आहे.
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम भागातील समुद्र किनारपट्टीवर फेजल चक्रीवादळ धडकले आहे. चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात तीव्र स्वरूपातील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
केरळ, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या दक्षिणेकडील राज्यात मुसळधार पाऊस पडला आहे.
त्यामुळे डिसेंबर थंडीचा महिना असूनही पावसाळी हवामान तयार झाले. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत तापमानात वाढ झाली. परिणामी, थंडीचे प्रमाणही कमी झाले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्याचा फारसा प्रत्यक्ष प्रभाव दिसलेला नव्हता. गतआठवड्यामध्ये थंडीचे प्रमाण वाढले होते.
दोन दिवसांपूर्वी पहाटे तालुक्यातील काही भागांमध्ये हलकासा पाऊस पडला. त्यानंतर सलग तीन दिवस ढगाळ वातावरण होते. सकाळची थंडीही गायब झाली आहे. रात्री प्रचंड उष्मा जाणवत आहे.
दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये थंडीचे वाढणारे प्रमाण आंबा-काजूला मोहोर येण्यासाठी अनुकूल ठरते. या महिन्यामध्ये मोहोर आल्यास चांगली आणि वेळेमध्ये फळधारणा होऊन बागायतदार अन् शेतकऱ्यांना चांगले उत्पादन अन् उत्त्पन्न मिळते. मात्र, यावर्षी मोहोर येण्याच्या कालावधीमध्ये थंडी गायब झाल्याले त्याचा प्रतिकूल परिणाम आंबा-काजू हंगामावर होण्याची भीती बागायतदार, शेतकरी यांच्याकडून वर्तवली जात आहे. पुन्हा थंडी पडल्यास यावर्षीचा आंबा आणि काजूचा हंगाम लांबणीवर पडून आर्थिक नुकसानीचा भुर्दड सहन करावा लागण्याची चिंताही बागायतदारांना आतापासून सतावू लागली आहे.
झाडांना पालवी फुटती होती: मात्र, अवकाळी पावसामुळे ती कुजून जाण्याची शक्यता आहे. गेल्या दोन- -तीन दिवसांपासून थंडी गायब झाली असून, या बदलाचा परिणाम आंबा-काजू हंगामावर झाला आहे. त्याचा आर्थिक फटका बागायतदारांना बसू शकतो. – विकास शिंदे, बागायतदार
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 07/Dec/2024