रत्नागिरी : येथील आसमंत बेनवोलन्सच्या वतीने आसमंत सागर महोत्सव ९ ते १२ जानेवारी २०२५ असे चार दिवस साजरा होणार आहे. महोत्सवाचे हे सलग तिसरे वर्ष असून, यावर्षीच्या कार्यक्रमात वैविध्य असणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष नंदकुमार पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, मानवी उत्क्रांतीत सागरांचे महत्त्व अपार आहे. आधुनिक अर्थव्यवस्था आणि मानवी स्वास्थ्य यातही सागरांचे मोठे योगदान आहे. सागरी परिसंस्था आणि त्याचे महत्त्व सामान्य नागरिकांपर्यंत नेणे आणि त्यातून संवर्धन कार्याची प्रेरणा देणे, याच ध्येयातून तीन वर्षांपूर्वी सागर महोत्सव सुरू झाला. गेल्या दोन वर्षांत सुमारे १० हजार लोकांपर्यंत आम्ही पोचलो, त्यातून अनेक शाळा-कॉलेजनी प्रेरणा घेऊन कामे हाती घेतली, यातच आम्ही यश मानतो.
भारतासाठी ब्लू (नील) अर्थव्यवस्था म्हणजे महासागर आणि सागरी परिसंस्थांशी संबंधित अनेक आर्थिक संधी, जी उपजीविका निर्माण करण्यात आणि टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. लाखो नोकऱ्या उपलब्ध करून देणारी आणि आणखी अनेक संधी निर्माण करणारी काही प्रमुख क्षेत्रे म्हणजे मत्स्यपालन, शिपिंग, पर्यटन, खोल समुद्रातील खाणकाम, ऑफशोअर ऊर्जा संसाधने, सागरी संशोधन, महासागर संवर्धन आणि महासागर विज्ञान यासह महासागर आधारित क्षेत्रे आहेत. १२ प्रमुख आणि २०० लहान बंदरांसह नऊ किनारी राज्ये, चार केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या ७५०० किमी लांबीच्या किनारपट्टीसह, भारताची निळी अर्थव्यवस्था देशाच्या ९५ टक्के व्यवसायाला वाहतुकीद्वारे समर्थन देते आणि त्यात मोठे योगदान असते. त्याच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) अंदाजे ४ टक्के योगदान आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वांत मोठा मत्स्योत्पादक आणि मत्स्यपालन मासे उत्पादक देश आहे. पुढील काही दशके ही निळी अर्थव्यवस्था आपल्याला तारून नेईल. या सागराशी मैत्री साधत आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन त्याचे जतन, संवर्धन करण्यासाठी तीन वर्षांहून अधिक प्रयत्न करत आहे. सागर आणि त्याच्या भोवती असलेल्या परिसंस्थेचे जतन महत्त्वाचे आहे.
त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या सागर महोत्सवामध्ये गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, मत्स्य महाविद्यालाय, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था (गोवा), गोखले इन्स्टिट्यूट, सेंटर फॉर ससस्टेनेबल डेव्हलपमेंट (पुणे), इकॉलॉजिकल सोसायटी (पुणे), कोस्टल कॉन्झर्वेशन फौंडेशन (मुंबई) यांचा तांत्रिक सहभाग असणार आहे. आसमंतचे सागर आणि परिसंस्थेचे संशोधनात्मक कामही लवकरच सुरू होणार आहे. याआधी आसमंत आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयांनी कोस्टल मॅपिंगचे काम पूर्ण केले आहे. या वर्षी नौदलाच्या युद्धनौकांचे प्रदर्शन असणार आहे, असे पटवर्धन यांनी सांगितले.
महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांनी या सागर महोत्सवामध्ये सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 07-12-2024