चिपळुणातील १३० ग्रामपंचायतींमध्ये उद्या मिशन बंधारे अभियान

चिपळूण : पावसाळ्यानंतर नदी व नाल्यांमधून पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून जाते. हे पाणी अडवून ते जमिनीत झिरपण्यासाठी मिशन बंधारे ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यानुसार चिपळूण तालुक्यात १० डिसेंबर रोजी एकाचवेळी १३० ग्रामपंचायतींमध्ये हे मिशन राबविले जाणार आहे. यासाठी प्रत्येक ग्रा.पं.ला १० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

गावोगावी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक संस्था सहभागी होणार आहेत. दरवर्षी तालुक्यात मिशन बंधारे राबवून कच्चे, वनराई व विजय बंधारे ग्रामस्तरावर बांधले जातात. या वर्षीही पंचायत समितीच्या कृषी विभागाने मिशन बंधारेचे नियोजन केले आहे. त्यानुसार १० रोजी १३० ग्रामपंचायतींमध्ये हे मिशन राबविले जाणार आहे.

त्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींना १० बंधाऱ्यांचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. या अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्यांच्या फोटोसह त्यांचा अहवाल तयार केला जाणार आहे.

यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. लोकसहभागातून हे बंधारे बांधले जात असून यामध्ये सामाजिक, राजकीय, शैक्षणिक संस्था सहभागी होणार आहेत. मिशन बंधारेसाठी लोटेतील एक्सल, घरडा आदी कंपन्यांसह टीडब्ल्यूजे, नाम, अर्थ फाऊंडेशन यांचेही सहकार्य लाभत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 09/Dec/2024