चिपळूण : फेंगल चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण निर्माण झाली. चिपळूण तालुक्यात शुक्रवारी आणि शनिवारी पावसाचा शिडकावा झाला. तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब झाली. त्यामुळे आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रियेत व्यत्यय निर्माण झाला आहे. त्यामुळे बागायतदार धास्तावले आहेत.
शुक्रवार आणि शनिवारी चिपळूण तालुक्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली. मेघगर्जनेसह पाऊस पडल्याने बागायदार धास्तावले आहेत. पावासामुळे आंबा पिकावर विपरित परिणाम होण्याची भिती आहे. आधी हवामानातील बदलांमुळे आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया यावर्षी उशिरा सुरू झाली होती. लांबलेला पाऊस हे मागचे प्रमुख कारण होते. नोव्हेंबरच्या अखेरीस हवामानात गारठा जाणवायला सुरवात झाली. त्यामुळे आंब्याला मोहोर येण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले होते. मात्र फेंगल वादळामुळे थंडी गायब झाली. तापमानात वाढ झाली. ढगाळ वतावरणामुळे आद्रतेचे प्रमाण वाढले. त्यामुळे आंब्याला मोहोर येण्याच्या प्रक्रियेत अडसर निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४ हजार मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला असून यावर्षी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त होते. कोकणात यंदा दिवाळीनंतरही तुळशीविवाहापर्यंत पाऊस सुरू होता. त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून आहे. ओलाव्यामुळे आंब्याच्या झाडाला पालवी मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोहराची प्रक्रिया उशिराने सुरू होऊन आंबा हंगाम लांबणीवर पडला आहे. त्यात थंडी गायब झाल्याने अधिकच भर पडली आहे.
चिपळुणात दरवर्षी दीडशे मेट्रिक टन उत्पादन
चिपळूण तालुक्यात आंब्याची सहा हजार हेक्टरवर लागवड केली आहे. ज्यातील साडेचार हजार हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे. दरवर्षी यातून दीडशे मेट्रिक टन उत्पादन मिळते, तर रत्नागिरी जिल्ह्यात ६७ हजार हेक्टरवर आंबा पिकाची लागवड केली असून सुमारे ८० हजार मेट्रीक टन उत्पादन होते.
गुलाबी थंडी टिकली नाही तर एका महिन्याने हंगाम लांबेल. पावसामुळे फळझाडांवरील मोहर गळून पडण्याची शक्यता आहे. तसेच नवी पालवी फुटेल. मोहोर न येता पालवी जून होण्याची शक्यता आहे. मोहर संरक्षण केलेल्या फळबागांचे फारसे नुकसान होणार नाही. पण मोहोर टिकविण्यासाठी फवारणी केल्यास फळबागांना संरक्षण कवच मिळेल. मात्र हे क्षेत्र किरकोळ प्रमाणात आहे. – संजय केतकर, आंबा बागायतदार, चिपळूण
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 09-12-2024