रत्नागिरी : फेंगल चक्रीवादळामुळे मागील पंधरा दिवस मच्छीमारांच्या जाळ्यात म्हणावी तशी मासळी मिळत नव्हती. मात्र चक्रीवादळ शमल्यानंतर दोन दिवस टायनी चिंगळ मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. गिलनेटच्या जाळ्यात सुमारे १०० ते १५० किलो टायनी चिंगळं सापडत आहेत. एकाचवेळी सर्वत्र चिंगळे मिळू लागल्याने किलोचा दर ५० रुपयांवर घसरलेला आहे. त्यामुळे मच्छीमारांना उत्पादन मिळूनही अपेक्षित उत्पन्न हाती आलेले नाही.
फेंगल चक्रीवादळाने तामिळनाडूला जोरदार तडाखा दिला. त्यानंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्याचा प्रभाव अरबी समुद्रात होता. त्यामुळे खोल समुद्रात पाण्याला प्रचंड करंट होता. अनेक मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणे टाळले होते. मासेही खोल पाण्यात गेल्यामुळे दुर्मिळ झालेले होता. ये-जा करण्याचा खर्च अधिक आणि उत्पत्न कमी अशी मच्छीमारांची स्थिती होती. याचा सर्वाधिक फटका गिलनेटद्वारे मासेमारी करणाऱ्यांना बसला. हवामान विभागाकडूनही मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा दिला गेला होता. फेंगलचा प्रभाव ओसरल्यानंतर खोल पाण्यात गेलेली मासळी पुन्हा पृष्टभागावर येऊ लागली आहे त्याचा फायदा सध्या मच्छीमारांना होत आहे. गेले दोन दिवस गणपतीमुळेपासून १२ वावामध्ये मोठ्याप्रमाणात टायनी चिंगळ जाळ्यात सापडत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील मच्छीमार या परिसरात डेरा टाकून आहेत. गिलनेटने मासेमारी करणाऱ्या नौकांना १०० ते १५० किलो तर फिलिप ट्रॉलीगला मोठ्याप्रमाणात टायनी मिळत आहे.
टायनीला किलोला ११० ते १२० रूपये दर अपेक्षित असतानाच माल अधिक असल्यामुळे किलोला अवधा ५० रुपयेच दर मिळत आहे. बहुसंख्य मच्छीमार चिंगळ कंपनीत देत आहेत. काही मच्छीमारांना चालू (थोडी मोठ्या आकाराची) चिंगळ मिळत आहेत. त्याला दर अधिकचा असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.
वादळ थंड झाल्यानंतर मासळी किनारी भागात येऊ लागली आहे. टायनी चिंगळ जानेवारीनंतर जाळ्यात सापडतात. मात्र यंदा ती लवकर मिळाली आहेत. माल अधिक असला तरीही दर मात्र मिळत नाही. अभय लाकडे, मच्छिमार
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 09/Dec/2024













