चिपळूण : पावसाळी हंगामात संपूर्ण शहरातील ऐंशी टक्के भागाला दरवर्षी पुराचा वेढा बसतो. या भागात असलेल्या नागरी वस्तीतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी शासन व नगर परिषद प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजनांची जय्यत तयारी असते. त्या अंतर्गत प्रामुख्याने पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी नगर परिषदेने काही यांत्रिकी होड्या खरेदी केल्या आहेत. शासनाकडून यांत्रिकी होड्या मिळाल्या आहेत.
मात्र सध्या या होड्या यंदाच्या पावसाळी हंगामानंतर काही ठिकाणी धूळखात उताण्या पडल्याचे दिसून येत आहे. हंगाम संपल्यानंतर या होड्या न.प. प्रशासनाने योग्य ठिकाणी हलविण्याची गरज असतानाही प्रशासनाची बेफिकीरी दिसून येत आहे.
चिपळूण शहरातील नागरिक पावसाळी हंगामात कायमच पूर व महापुराच्या भीतीखाली वावरत असतात. गेल्या अनेक वर्षांचा आढावा लक्षात घेता शहराला २००५ पासून मोठ्या महापुराचा फटका बसून करोडो रूपयांची आर्थिक हानी झालेली आहे. जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापुरामुळे शहरातील नागरिक संकटात सापडल्याने त्यांनी आवाज उठवला. शिव आणि वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी जन आंदोलन उभारण्यात आले. त्याचबरोबर न.प. प्रशासनाने देखील २००५ नंतर आलेल्या महापुरांचा अभ्यास करीत शहरातील ऐंशी टक्के नागरी वस्तीमध्ये महापुराचे पाणी जात असल्याचे लक्षात आल्यावर त्या-त्या ठिकाणी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविणे व त्यांना आवश्यक त्या सेवा पुरविण्याकरिता यांत्रिकी होड्या खरेदी केल्या. त्याचप्रमाणे सर्वपक्षिय नेते व लोकप्रतिनिधींच्या दबावानंतर शासनाने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत यांत्रिकी होडयांची उपलब्धता करून दिली.
सद्यस्थितीत अनेक वर्षांच्या महापुरांचा आढावा घेताना, न.प. कडे पूर्वी काही यांत्रिकी होड्या होत्या. त्यामध्ये हवेच्या रबरी होड्यांचा वापर तर २००५ नंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून मिळालेली अत्याधुनिक फायबरची यांत्रिकी होडी उपलब्ध झाली. त्या पाठोपाठ न.प. प्रशासन व शासनाने देखील गतवर्षी अत्याधुनिक फायबरच्या यांत्रिकी होडया न.प. कडे दिल्या. या वर्षीच्या पावसाळी हंगामात त्या मानाने महापुराचे पाणी शिरले नसले तरी उपलब्ध यांत्रिकी होड्या शहरातील पाण्याचा जोर जास्त असलेल्या विविध ठिकाणी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जून ते सप्टेंबर अंतर्गत होड्यांसह आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली जाते. सप्टेंबरनंतर पावसाचा जोर कमी झाल्यावर सर्व यंत्रणा सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी न.प. प्रशासनाची असते. त्यानुसार विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या न.प. मालकीच्या यांत्रिकी होड्यादेखील प्रशासनाकडून सुरक्षित व योग्य ठिकाणी ठेवल्या जातात.
मात्र यंदाच्या पावसाळी हंगामात विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या होड्या अद्यापही त्याच ठिकाणी धूळखात उताण्या पडल्या आहेत. प्रशासनाच्या बेफिकिरीचा फटका यांत्रिकी फायबर होड्यांना बसणार आहे. या गंभीर विषयाकडे न. प. प्रशासनासहीत सर्वपक्षिय नेते व लोकप्रतिनिधीकडूनही दुर्लक्ष झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
प्रशासनाची उदासीनता
२००५ नंतर शासनाने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत चिपळूण शहरासाठी दिलेल्या अत्याधुनिक फायबर यांत्रिकी होडीची सद्यस्थितीत अशीच विल्हेवाट लागली आहे, ही यांत्रिकी होडी नेमकी महसूलच्या की न.प. च्या ताब्यात द्यायची यावरून कोणताही निर्णय आजतागायत झालेला नाही. त्यामुळे सद्यस्थितीत ही अत्याधुनिक यांत्रिकी नौका दुरवस्था होऊन निकाली निघाली आहे. प्रशासनावर अंकूश ठेवण्याचे काम सर्वपक्षिय लोकप्रतिनिधी व नेत्यांचे असते. मात्र, शासनाकडून मिळालेल्या या होड्या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शहरात विविध ठिकाणी अद्यापही गटाराच्या कडेने धूळखात पडल्यामुळे या बाबत सर्वांची उदासीनता दिसून येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 PM 09/Dec/2024














