रत्नागिरी : सैतवडेच्या उपसरपंचानी केली रस्त्याची साफसफाई

गणपतीपुळे : आजकाल लोकप्रतिनिधींकडून कामे सुचविली जातात आणि इतरांकडून ती करून घेतली जातात. तसेच एखादे काम करताना त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी रुबाबदार पोशाखात दिसतात. आमदार, खासदार यांच्याबरोबर फिरणारे पदाधिकारीही रुबाबात असतात. याचबरोबर काही ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रा.पं. सदस्यही मोठ्या थाटात सर्वत्र फिरत असतात. मात्र यामधील एखाद्या लोकप्रतिनिधीने जर सार्वजनिक ठिकाणचे काम केले तर मग नवलच! परंतु याच गोष्टीला अपवाद ठरले आहेत, रत्नागिरी तालुक्यातील सैतवडेचे उपसरपंच सुवेश चव्हाण.

रत्नागिरी तालुक्यातील सैतबडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि पेशाने शिक्षक असलेल्या सुवेश चव्हाण यांनी नुकतीच सैतवडे येथील जिल्हा परिषद क्रमांक एक सैतवडे शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची साफसफाई स्वतःकडे असलेल्या ग्रास कटर मशीनने केली आणि हा रस्ता चकाचक केला.

या शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली होती. तसेच रस्त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गवतही वाढले होते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना त्या रस्त्याने ये-जा करताना मोठ्या अडचणीचे झाले होते.

त्यामुळे या रस्त्याने विद्यार्थी जात असल्याने हा रस्ता रहदारीसाठी अतिशय सुसज्ज आणि योग्य प्रकारचा असला पाहिजे, अशा प्रकारची भावना सैतवडेचे उपसरपंच सुवेश चव्हाण यांच्या मनात निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी या रस्त्याची पाहणी करून स्वतःकडे असलेले ग्रास कटर मशीन घेऊन या रस्त्याची साफसफाई केली. त्यामुळे सध्या सैतवडे क्रमांक एक शाळेकडे जाणारा रस्ता आता पूर्णपणे चकाचक झाला आहे. यामुळे विद्याथ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.

हा रस्ता चकाचक झाल्याने तसेच एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव लक्षात घेऊन सैतवडेचे उपसरपंच असलेल्या सुवेश चव्हाण यांनी स्वतः शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची साफसफाई करून दिल्याबद्दल संबंधित शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वर्ग, पालक आणि ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. उपसरपंच सुवेश चव्हाण यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 PM 09/Dec/2024