पश्चिम घाटातील वैभवाचा अभ्यास व्हावा : डॉ. सुमंत पांडे

रत्नागिरी : लाखो लिटर्स पाणी नदीच्या कोडीमध्ये होते. पण गाळ साचल्याने पाणी वाहून जाते व कोंडी सपाट होऊ लागल्या आहेत. कोंडीमध्ये पूर्वी घोरपी जमातीचे लोक मासेमारी करत. आज माशांअभावी त्यांना दुसरे रोजगार शोधावे लागत आहेत. पश्चिम घाट ही आपल्याला देणगी आहे. हे वैभव अभ्यासले पाहिजे, असे प्रतिपादन राज्य जलसाक्षरता केंद्राचे माजी कार्यकारी संचालक, तज्ज्ञ डॉ. सुमंत पांडे यांनी केले.

येथील पर्यावरण संस्था गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत) आणि मरीन सिंडिकेट प्रा. लि. यांच्यावतीने आयोजित कोकणातील नद्या आणि खाड्या सद्यस्थिती, वापर आणि संवर्धन यावर परिसंवादात ते बोलत होते. डॉ. पांडे म्हणाले, ‘नदी गाळमुक्तीचा साखरपा पॅटर्न केला आहे. प्रत्येक ठिकाणी अभ्यास करून, स्थानिकांची मते जाणून घेऊन आराखडा बनवला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करून त्याच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे. एखाद्या नदांचा आपल्याला शक्य असलेला भाग सुधारण्यासाठी मेहनत घ्यावी अभ्यास, आर्थिक मदत, जी जी मदत शक्य आहे. त्याने ती करावी. खाड्यांमध्ये मासे व जलचरांचे प्रजनन होत असते. पण प्लास्टिकमुळे त्यांचे जीवन अडचणीत आले आहे.

कोकण ही भगवान परशुरामाची पवित्र भूमी आहे. नथा म्हणजे संस्कृती आहे. प्रदूषण ही वर्तनाशी निगडित गोष्ट आहे. आपण भारतात नदीला माता म्हणतो पण वर्तन तसे ठेवत नाही. उलट परदेशात नदीला काही म्हणत नाहीत पण तिथल्या नद्या स्वच्छ आहेत. पुण्यामध्ये तीस वर्षांपूर्वीचे डीडीटीचे कॉम्पोनंट नदीच्या पाण्यात आदळले आहेत. काही जंतू हे अँटिबायोटिकलासुद्धा दाद देत नाहीत. रासायनिक कंपन्यांचे पाणी नदीतच सोडले जाते. एबसीएल, एचएनओ ३ ही द्रव्ये नर्यातय जात आहेत. याकरिताच जलसाक्षरता आवश्यक आहे. त्याकरिता दर दहा किलोमीटरवर जलदूत मिळावेत, असे डॉ. पांडे म्हणाले.

संभाजीनगर येथे ५५ हजार मेट्रिक टन डिटर्जंट वापरला गेल्याची आकडेवारी उपलब्ध झाली. एवढा डिटर्जंट पुन्हा सांडपाण्यासोबत निसर्गातच फेकला गेला. नदी, समुद्रातच ही भर पडत आहे. भविष्यातील चित्र भयानक असणार आहे. त्यामुळे नदीकडे बघण्याचा दृष्टिकोन सुधारला पाहिजे. कोकणात २३ नद्यांची खोरे आहेत. या नद्या अवखळ, सौम्य, शांत आणि रौद्र रूप धारण करणाऱ्या आहेत. देशात ५५ नद्या प्रदूषित आहेत. त्यात कुंडलिका नदीचे नाव आहे. कोकणातील अन्य नद्यांची नावे येऊ देत नको अशी मी प्रार्थना करतो, असे पांडे यांनी सांगितले.

जलवाहतूक बंद
कोकणाच्या ७२० किलोमीटरच्या किनारपट्टीत मुंबई ११४, ठाणे १२७, पालघर १२२, रत्नागिरी २३७ आणि सिंधुदुर्गला १२० किमी लाभला आहे. १८८० च्या ब्रिटिश गॅझेटनुसार कोकणात जलवाहतूक सुरू होती. नदी, खाडीतून गलबते जात होती. गेल्या चाळीस वर्षात ती बंद झाली. गाळमुक्तीसाठी आराखडा बनवून प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. पांडे यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 09/Dec/2024