मुंबई : “मी जे निवडून आलोय, त्याबद्दल टिंगल… तुम्हाला आता नंबर द्यावे लागतील उपमुख्यमंत्र्यांना भविष्यात. एक नंबरचा उपमुख्यमंत्री आणि दोन नंबरचा उपमुख्यमंत्री. मला मिळालेल्या २०८ मताधिक्याबद्दलची टिंगल याठिकाणी उडवली जातेय”, असे म्हणत नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला.
विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर झालेल्या भाषणादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पटोलेंच्या मताधिक्याचा उल्लेख करत टोला लगावला.
मी सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलोय -पटोले
विधानसभेत बोलताना नाना पटोले म्हणाले, “खरंतर इथे निवडून आलेलाच माणूस येऊ शकतो. किती मतांनी आला त्याची गिनती नाही. सुरूवातीलाच त्याची आकडेवारी असते. मी आणि देवेंद्रजी, पहिल्यांदा जेव्हा इथे आलो २००४ मध्ये सर्वाधिक मताधिक्याने आलो होतो. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत मी सर्वाधिक मताधिक्य घेऊन आलो होतो. त्यामुळे इथे काही बक्षीस मिळतं असा चर्चेचा विषय होऊ शकत नाही.”
“लोकांनी मतदान केलं आहे. त्या मतदानाच्या आधारावरच या सभागृहात मी आलेलो आहे. त्याबद्दलची टिंगल याठिकाणी केली जातेय. जनतेच्या मतांवरच हास्यकल्लोळ करायचा असेल, तर हे काही बरोबर नाही”, अशा शब्दात नाना पटोलेंनी नाराजी व्यक्त केली.
एकनाथ शिंदे काय बोलले?
“गेल्यावेळी तुम्ही म्हणाला होतात की, डाव्या बाजूची जास्त काळजी घ्या. जनतेनेच डाव्या बाजूची जास्त काळजी घेतलेली आहे. खरं म्हणजे जयंतराव आहेत, तर आता मज्जा आहे. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज बाबा सभागृहाच्या बाहेर गेले. नाना वाचले २०८. ईव्हीएममध्ये घोटाळा असता तर तुम्ही वाचले नसते”, असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला.
अजित पवारांनीही पटोलेंना लगावला टोला
अजित पवार विधानसभेत बोलत असताना नाना पटोलेंनी गुलाबी जॅकेटबद्दल विचारलं. त्यावर अजित पवार म्हणाले, “गुलाबी जॅकेट आज मुख्यमंत्र्यांना दिले आहे. २०८ वाले आता रंगही विसरायला लागले आहेत. मला शिंदेंनी सांगितलं २०८”, असे म्हणत अजित पवारांनी पटोलेंना डिवचलं.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:13 09-12-2024