चिपळूण : रत्नागिरी, लांजा व चिपळूण या ‘हायटेक’ बसस्थानकाचे एकाचवेळी काम हाती घेण्यात आले होते. मात्र गेली सहा वर्षे या ना त्या कारणाने ही कामे रखडली आहेत. यातील चिपळूण बसस्थानकाच्या कामाला अजूनही गती आलेली नाही. त्यामुळे नव्या सरकारच्या काळात या कामाचा मुहूर्त निघणार का? असा सवाल आता एस. टी. प्रवासी व्यक्त करीत आहे.
चिपळूण बसस्थानकाचे काम २०१७ मध्ये सुरू झाले. तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी या कामांचे भूमिपूजन केले होते. मात्र त्यानंतर आलेल्या पालकमंत्री व परिवहनमंत्री अनिल परब यांनी वा कामाकडे परते दुर्लक्ष केले. या हायटेक पद्धतीच्या बसस्थानकासाठी चिपळूणला ३ कोटी ८० लाखांचा खर्च येणार आहे. रत्नागिरीसाठी आणखी कोट्यावधीचा निधी पालकमंत्री सामंत यांनी मिळवून दिला. मात्र वाढीव निधी अभावी चिपळुणातील हायटेक बसस्थानकाचे काम अडचणीत आले आहे. त्यामुळे चिपळूण बसस्थानकाच्या बांधकामाबाबत गेल्या पाच वर्षांपासून प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
प्रत्यक्षात चिपळुणातील काम २४ महिन्यात होणे अपेक्षीत होते. मात्र ६ वर्षे उलटली तरी चिपळूण बस स्थानकाच्या इमारतीच्या तळमजल्याचे काम सुरू आहे. बांधकामाचे लोखंडही गंजून गेले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण मध्यवर्ती बसस्थानक केंद्रस्थानी आहे. या ठिकाणी २४ तास एसटीची सेवा सुरू असते. कार्यशाळा देखील २४ तास सुरू असते. मात्र स्थानकाची इमारत नसल्याने प्रवाशांसह कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. आधीची जुनी इमारत बरी होती, असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
या इमारतीचे बांधकाम सुरू होण्यासाठी अनेकांनी आंदोलने देखील केली. अॅड. ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर ऑगस्ट महिन्यात झालेल्या सुनावणीत ठेकेदार कंपनीने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. मात्र सद्यस्थितीत काम थांबले आहे.
तीन पालकमंत्री मात्र काम अर्धवट!
गेले सहा वर्षे या ठिकाणी उन्हाळा पावसाळा आणि हिवाळ्यात एसटी प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. आता येथील एसटी प्रशासनाने शेडमधील बाके देखील काढल्याने लोकांना एसटी ची प्रतीक्षा करताना बसण्याची व्यवस्था देखील नाही. त्यामुळे मोठी अडचण होत आहे. सहा वर्षात जिल्ह्याला तीन पालकमंत्री लाभले. मात्र एकाही पालकमंत्र्याच्या काळात एसटी स्थानक पूर्ण होऊ शकले नाही. ही शोकांतिका आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:40 PM 09/Dec/2024